
प्रतिनिधी नागपूर
नागपूर दि.26 : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवार रिंगणात कायम आहेत. दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले अर्ज परत घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विमला आर यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीसाठी 16 नोव्हेंबर रोजी अधीसूचना जारी करण्यात आली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी 5 उमेदवारी अर्ज आले होते. 24 नोव्हेंबर रोजी या अर्जाची छाननी करण्यात आली छाननीअंती पाचही उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते. यामध्ये चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे (भारतीय जनता पार्टी), प्रफुल्ल विनोदरावजी गुडधे (इंडियन नॅशनल काँग्रेस) रवींद्र प्रभाकर भोयर (इंडियन नॅशनल काँग्रेस), मंगेश सुधाकर देशमुख (अपक्ष), सुरेश दौलत रेवतकर (अपक्ष) यांच्या वैध अर्जाचा समावेश होता.
आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत प्रफुल्ल विनोदराव गुडधे, सुरेश दौलत रेवतकर या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे नागपूर स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे- भारतीय जनता पार्टी, रवींद्र प्रभाकर भोयर- भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, मंगेश सुधाकर देशमुख अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहेत.
10 डिसेंबरला सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत निवडणूक होणार आहे. 14 डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.