Breaking News

सैनिक कुटुंबियांच्या अडीअडचणी सोडविण्यास जिल्हा प्रशासन सदैव तत्पर – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 17 डिसेंबर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे जवान सीमेवर रक्षण करीत असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत. यात अनेक जवानांना आपल्या प्राणाची आहुतीसुध्दा द्यावी लागते. कधीही भरून न निघणारी ही हाणी आहे. त्याची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र असे असले तरी शहिदांचे कुटुंब तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांना कोणतीही अडचण असल्यास नि:संकोचपणे सांगा. आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ, विजय दिवस व माजी सैनिक मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे, माजी सैनिक सर्वश्री सुरेश बोभाटे, अनिल मुसळे, राजेंद्र भोयर, विजय तेलरांधे, हरीश गाडे तसेच वीर माता, वीर पिता, वीर पत्नी व पाल्य उपस्थित होते.


सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन व विजय दिवस हा विशेष असा दिवस आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, सैनिकांच्या बलिदानाची भरपाई कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. मात्र सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञतेचा भाग म्हणून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा हा एक प्रयत्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माजी सैनिक किंवा शहिदांच्या कुटुंबियांचे काही प्रश्न असल्यास त्यांनी प्रशासनाला याबाबत अवगत करावे. प्रशासनाकडून प्राधान्याने ते प्रश्न सोडविले जातील, असे जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

यावेळी जिल्ह्यातील वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच शौर्यपदक धारकांना साडीचोळी तसेच शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये शहीद शिपाई गोपाल भिमनपल्लीवार यांच्या वीरपत्नी श्रीमती वेंकम्मा गोपाल भिमनपल्लीवार, शहीद हवालदार सुनील रामटेके यांच्या वीरपत्नी श्रीमती अरुणा रामटेके, शहीद शिपाई प्रवीणकुमार सुदाम कोरे यांच्या वीरमाता श्रीमती शीला सुदाम कोरे, शहीद शिपाई मनोज नवले यांच्या वीर माता छाया बाळकृष्ण नवले, शहीद शिपाई योगेश वसंतराव डाहुले यांच्या वीरमाता पार्वती डाहुले व वीरपिता वसंतराव डाहुले, तसेच माजी नायब सुभेदार (शौर्य चक्र) शंकर मेंगरे आदींना सत्कार करण्यात आला.

तसेच विशेष गौरव पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्य यांना शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील माजी सैनिक नारायण बलखंडे यांची पाल्या कुमारी ऐश्वर्या बलखंडे हिला नामवंत शैक्षणिक संस्थेत प्रवेशाकरीता 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सैनिक विभागातर्फे माध्यमिक,उच्च माध्यमिक, पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सात पाल्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात धनपाल मंगरू निहाटे यांचा पाल्य कुमार साहिल, किशोर बाजीराव मेश्राम यांची पाल्या खुशबू मेश्राम, तर धनपाल पांडुरंग हजारे यांचे पाल्य कुमार डेनिम हजारे यांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

सैन्यात तसेच निमलष्करी दलातील अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी जवानांना आर्थिक मदत देण्यात येते. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नरेंद्र रामजी बगमारे यांना देशांतर्गत सुरक्षासंबंधी ऑपरेशन मोहिमेत जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे कार्यरत असताना अपघात होऊन 80 टक्के अपंगत्व आले. त्यांना 3 लक्ष रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून झाली तर सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश …

इयत्ता 12वीचा निकाल उद्या

शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved