Breaking News

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा होणार कायापालट

निधी उपलब्धता व इतर मागण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

योग्य नियोजन करून आराखडा सादर करण्याच्या सूचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 4 फेब्रुवारी : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघ दर्शनासाठी तसेच इतर वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. या प्रकल्पाचे पर्यावरण संवर्धन व पर्यटन क्षेत्र विकासासाठी उपाययोजना व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानुसार व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी ताडोबाचा नुकताच आढावा घेतला. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक असल्यामुळे आता ताडोबा प्रकल्पाचा जागतिक स्तरावर कायापालट होण्यास मदत होईल, अशी माहिती पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र सफारी निर्माण करणे, वन्यजीव बचाव केंद्र निर्माण करणे, व्याघ्र प्रकल्पातंर्गत येणाऱ्या वनविभागाचे कार्यालय एकत्रित करण्याकरिता ताडोबा भवनाचे बांधकाम करणे, व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी, कोळसा व कारवा या गावाचे पुनर्वसन करणे, मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरिता शेतकऱ्यांना सौर कुंपन मंजूर करणे, बफर क्षेत्रामध्ये एरियल बंच केबलद्वारा वीजपुरवठा करणे, व्याघ्र प्रकल्पातील इको सेन्सेटिव्ह झोनचा डीपी प्लॅन मंजूर करणे, तसेच व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यास मान्यता प्राप्त असल्याने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

त्यानुसार, वन्यजीव बचाव केंद्रासाठी 39 कोटी 38 लक्ष, व्याघ्र सफारी करीता 58 कोटी 6 लक्ष, बांबू फूलोरा व्यवस्थापनकरीता 15 कोटी 80 लक्ष, ताडोबा भवनसाठी 18 कोटी 8 लक्ष, कोअर क्षेत्रातील कोळसा येथील 142 कुटुंबाच्या पुनर्वसनाकरीता 19 कोटी 48 लक्ष, रानतळोदी येथील 222 कुटुंबासाठी 45 कोटी 20 लक्ष, बफर क्षेत्रातील कारवा येथील 330 कुटुंबाच्या पुनर्वसनाकरीता 70 कोटी, मानव – वन्यजीव संघर्ष कमी करणे तसेच शेतपिकांची हाणी टाळणे याकरीता दोन हजार शेतकऱ्यांना 2 कोटी रुपये खर्च करून सोलर कुंपन वितरीत करणे आणि बफर क्षेत्रामध्ये वीज पुरवठा करण्यासाठी 31 ठिकाणांवर ओवरलोड वायरचे एरियल बंच तयार करण्यासाठी 3 कोटी रुपये 2022-23 या वर्षात प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

पर्यावरणाचे रक्षण करतांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करावा, असे सांगून मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, चंद्रपूर शहरालगत व्याघ्र सफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निमिर्तीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करावे. वन्यजीव रेस्क्यु सेंटरला मंजूरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण १८ कोटी रुपयांची आवश्यकता असून या वित्तीय वर्षात ३ कोटी तर उर्वरित निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य वन्यजीव मंडळाच्या 17 व्या बैठकीत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्याचा क्षेत्र विस्तार करण्यास व हे क्षेत्र गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार असून या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर कारवा गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर क्षेत्रातील बांबूला फुलोरा येण्यास सुरुवात झाली असून यासंबंधीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात बांबू कुपांची कामे, जाळरेषेचा विस्तार, अतिरिक्त अग्नी संरक्षक मजूर लावणे, बिनतारी संदेश यंत्रणेचे बळकटीकरण करणे, बांबू बिया गोळा करून सीड बॉल तयार करणे अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठीही निधीची तरतूद करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिले.

बैठकीला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी, प्रभारी वनबल प्रमुख वाय. एल. पी.राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, यांच्यासह वनविभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता सुरू …

अख्या गावाभोवतीच लावले वनविभागाने ब्रॅण्डेड नेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/सावली:-सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र पेंढरी नियतक्षेत्र पेंढरी मधील मौजा पेंढरी वड हेटि येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved