
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-मुलींच्या जन्मदारात वाढ करणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, स्त्री भ्रुण हत्या रोखणे, मुलींचे शिक्षण व आरोग्याचा दर्जा वाढविण्यास प्रोत्साहन देण्याच्या उदात्त हेतूने महिला व बालकल्याण विभागामार्फत केंद्र सरकार पुरस्कृत, राज्य सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभीड, व चिमूर तालुक्यासह राज्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल केले. परंतु संबधित विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यासाठी अनुदान वाटप करण्यात आले नसल्याचे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना सांगण्यात येत आहे. परिणामी, शासनामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणारी कल्याणकारी योजना थंडबस्त्यात आली असून ती गुंडाळण्यात येणार असल्याचे चिन्हे ब्रम्हपुरी, नागभीड व चिमूर तालुक्यात दिसून येत आहे.
या योजनेसाठी शासनाकडून दोन वर्षापासून अनुदान उपलब्ध होत नसल्याने अर्ज केलेले लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे सदर योजनेसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे व नागरिकांच्या कल्याणाकरीता असलेल्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, यांना संदिप भस्के उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख केवळराम पारधी, उपतालुका प्रमुख डॉ.रामेश्वर राखडे, गुलाब बागडे विभागप्रमुख, माजी शहरप्रमुख शामराव भानारकर, गणेश बागडे शाखाप्रमुख माहेर, प्रविण कुथे, ठेंगरे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते._