Breaking News

केवळ धानाच्या प्रेमात अडकून राहू नका – जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे

पाण्याचा प्रत्येक थेंब काटकसरीने वापरण्याचे आवाहन

गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांच्या समृध्दीसाठी दिशादर्शन कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 22 मार्च : धान उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. मात्र असे असले तरी येथील शेतकरी धानाच्या भरोश्यावर समृद्ध झाल्याचे चित्र नाही. या परिसरात गोसीखुर्द प्रकल्पामुळे बारमाही पाण्याची व्यवस्था होत आहे. त्यामुळे किती काळ केवळ भातच पिकवायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पाण्याची मुबलकता असल्यामुळे धान्याच्या प्रेमातून बाहेर या व आंबा, केळी, मोसंबी, संत्रा या पिकांचासुध्दा विचार करा, असे आवाहन कृषी व जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांनी शेतक-यांना केले.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर आणि मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुल येथील कर्मवीर मा.सा.कन्नमवार सांस्कृतिक सभागृहात ‘गोसीखुर्द प्रकल्पातील लाभधारकांच्या समृध्दीसाठी दिशादर्शन’ ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्‍य अभियंता आशिष देवगडे, अधिक्षक अभियंता अंकुर देसाई, प्रकल्प समन्वयक डॉ. सुरेश मैंद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, संदीप हासे, जितेंद्र दूरखेडे, संजय वैद्य, गोविंद पेंढारकर आदी उपस्थित होते.

राज्यात जवळपास 15 लक्ष हेक्टरवर धानाची शेती होत असून पूर्व विदर्भात साडेसहा हेक्टरवर धान पिकवला जातो, असे सांगून डॉ. भोंगळे म्हणाले, आपल्या भागात प्रति हेक्टरी केवळ दोन ते अडीच टन धानाची उत्पादकता आहे. तर दुसरीकडे व्हिएतनाम सारख्या देशात धानाची प्रति हेक्टरी उत्पादक क्षमता 12 टनाच्या आसपास आहे. त्यामुळे धानामध्ये नवीन संशोधन होणे गरजेचे असून त्याची उत्पादकता वाढविण्याचे आवाहनही आपल्या समोर आहे. आपल्या कुटुंबाचा विचार करूनच आपण शेती करतो. त्यामुळे शेतीतून अधिक परतावा कसा मिळेल, याचाही विचार व्हायला पाहिजे. वैनगंगेच्या खो-यात पाण्याची मुबलकता असल्यामुळे आणि गोसीखुर्दच्या माध्यमातून हे पाणी आपल्या शेतापर्यंत येणार असल्यामुळे फळबाग लागवडीचा शेतक-यांनी विचार करावा. विशेष म्हणजे फळबाग लागवडीमध्ये पाण्याची उपलब्धता 80 टक्के असणे आवश्यक आहे. हवामानाचा घटक हा केवळ 20 टक्केच असतो.

राज्यत ऊस उत्पादक प्रदेश म्हटला की पश्चिम महाराष्ट्र व आंबा म्हटले की कोकण, एवढेच आपल्याला माहित आहे. मात्र जिल्ह्यातील सिंदेवाही येथे ऊस संशोधन केंद्र होते, तसेच एकेकाळी या भागात आंबाही चांगल्या प्रकारे पिकविल्या जात होता, हे अनेकांना माहित नाही. आजही केशर, रत्ना, सोनपरी हा आंबा या भागात लावता येतो. एवढेच नाही तर वरंब्यावर तूर आणि रब्बीत बटाटा लावल्यास प्रत्येक तीन ते पाच महिन्यात एक नवीन पीक हाताशी येऊ शकते. शेतीमध्ये सर्वात जास्त रोजगार देण्याचे सामर्थ्य आहे. शेतीच आपल्याला भविष्यात तारणार आहे. त्यासाठी शेतीमध्ये सामुदायिक काम करावे लागेल.

पाणी वापरासंदर्भात डॉ. भोंगळे म्हणाले, आजही देशातील 75 टक्के पाणी वाहून समुद्राला मिळते. केवळ 25 टक्केच पाणी आपण अडवितो. वैनगंगेचे 1200 टीएमसी पाणी वाहून जाते. तर गोसीखुर्द प्रकल्प केवळ 40 टीएमसी क्षमतेचा आहे. गोसीखुर्दमुळे जे प्रकल्पग्रस्त झाले, त्या कुटुंबांनी आपल्यासाठी मोठा त्याग केला आहे. याची जाणीव ठेवा. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहा व पाण्याचा काटकसरीने वापर करा, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात श्री. देवगडे म्हणाले, आजही ‘धान पे धान’ हीच परिस्थिती या भागात दिसते. यात बदल होणे आवश्यक आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचा मुख्य अभियंता म्हणून येत्या दीड ते दोन वर्षात आपल्या दारापर्यंत पाणी पोहचविले जाईल. पाण्याच्या प्रत्येक थेंबातून आपल्या दारी समृध्दी यावी, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. विशेष म्हणजे त्यासाठी शेतक-यांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. बदलण्यासाठी तयार रहा. पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून एक चांगला समन्वय घडवून आणू, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणा-या 14 पाणी वापर संस्थांना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यात किसान पाणी वापर संस्था, कृषी, कृषी संजीवनी, तिरुपती, मेघराज, वैनगंगा, जलक्रांती, गोवर्धन, जय जवान जय किसान, जीवन समृद्धी, सुजल, निसर्गराजा, जलजीवन, शेतकरीराजा पाणी वापर संस्थेचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी प्रसिद्ध अभियंते एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता अंकुर देसाई यांनी केले. संचालन शशांक रायबोरडे यांनी तर आभार राजेश सोनोने यांनी मानले. कार्यक्रमाला पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी, शेतकरी यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved