
नागपूर दि. 31 : जिल्हाधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांना आज एका भावपूर्ण सोहळ्यामध्ये निरोप देण्यात आला. शासकीय सेवेतून 31 मार्च रोजी ते निवृत्त झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित केला होता.
बचत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी डॉ. सुजाता गंधे, शिरीष पांडे यांच्या सुविद्य पत्नी करुणा पांडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या 37 वर्षापासून विदर्भाच्या विविध जिल्ह्यांमध्ये शासनाच्या सेवेत असणारे श्री. शिरीष पांडे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सुपरिचित आहे.शासकीय सेवेत असताना एकमेकांच्या मदतीने शासनाच्या योजना राबवाव्या लागतात. प्रत्येकाला विशिष्ट काम दिले असते. मात्र ते काम एकट्याने पूर्ण होत नाही.परस्परांना पूरक कार्य असते.त्यामुळे टीम वर्क महत्त्वाचे असते. टीम वर्क करत कार्य करण्याचे पांडे यांचे कसब लक्षणीय असल्याचे प्रतिपादन यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्री पांडे यांच्या प्रदीर्घ काळात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यासोबत सौहार्दपूर्ण संबंध आणि समन्वयाची भूमिका वाखाणण्यासारखी होती, असे त्यांनी सांगितले.
शिरीष पांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासकीय सेवेतील सर्वात मोठे समाधान अनेकांना यंत्रणेच्या मार्फत न्याय मिळवून देण्याची संधी मिळणे होय. ही यंत्रणा आहे म्हणून संधी आहे. अन्य कोणत्याही ठिकाणी काम करताना लोक सेवेची संधी मिळत नाही. मात्र शासनामध्ये ही संधी मिळते. त्यामुळे जनसेवकाच्या भूमिकेतून जनसेवा करण्याचा आनंद प्रदीर्घ काळात आपल्याला मिळाला असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. याच भूमिकेतून सर्वानी काम करावे, ही यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी समन्वयकाची वृत्ती व जनतेचे सेवक म्हणून काम करण्याची भूमिका ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या 37 वर्षांमध्ये शिरीष पांडे यांनी नायब तहसीलदार ते अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदापर्यत कार्य केले. गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध पदांवर काम केले. तसेच त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातही महत्त्वाच्या पदावर कार्य केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली तातंगे यांनी केले. प्रास्ताविक विजया गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन तहसीलदार निलेश काळे यांनी केले. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री. पांडे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
00000