
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर दि. १२/०९/२०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे आज दिनांक १२/०९/२०२२ रोजी महाविद्यालयाचा ३० वा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक व संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंदनसिंग रोटेले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिलीपसिंग गिरासे, कारागृह अधिक्षक, येरवाडा कारागृह, पुणे, माजी प्राचार्य सुनिल सुभेदार, किरणताई रोटेले, माजी सिनेट सदस्या, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर, डॉ. शुभांगी वडस्कर, प्राचार्या, आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर, राजेंद्र मर्दाने, माजी विद्यार्थी संघटना सदस्य, आनंद भगत व त्यांचा संगीत संच, केडरॉक म्युझिकल फाऊंडेशन प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे शाल, श्रीफळ व गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर हे ग्रामीण भागात समाजकार्याचे विद्यार्थी घडवत असून चिमूर सारख्या क्रांती नगरीतून देशसेवेसाठी युवकांची फौज पुढे येत आहे. महाविद्यालय ग्रामीण भागातील असून देखील मागील तिस वर्षांपासून दर्जेदार शिक्षण देत आहे. बी. एस. डब्लू., एम. एस. डब्लू., एम. फिल. हे अभ्यासक्रम व संशोधन केंद्र देखील महाविद्यालयात आहे. समाजकार्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असून त्यांनी स्वतःचे जीवन उन्नत करावे.
तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विदेशातही नावलौकिक केला असल्याचा अभिमान वाटत असल्याचे व सध्या स्कूल सोशल वर्करची नियुक्ती करण्याकरिता फोरम संघटना कार्य करीत असल्याचे प्राचार्य डॉ. चंदनसिंग रोटेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रमुख पाहुणे दिलीपसिंग गिरासे यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, विद्यार्थ्यांनी कायद्याचा आदर व सन्मान केला पाहिजे, शिक्षकांचा आदर केला पाहिजे तसेच देशभक्ती व देशप्रेम अंगी बानावी असे मोलाचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाची वाटचाल व विकासाबाबत सविस्तर माहिती आपल्या प्रस्ताविकातून प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर दिली.
याप्रसंगी पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन करत असताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून महाविद्यालयाने अद्ययावत संगणिकृत असे संशोधन केंद्र निर्माण केले आहे. या संशोधन केंद्राचे उदघाटन डॉ. चंदनसिंग रोटेले यांचे शुभहस्ते करण्यात आले. तसेच केडरॉक म्युझिकल फाऊंडेशनच्या वतीने गायक कलावंतांनी संगीताचा कार्यक्रम सादर केला. हिंदी चित्रपटातील उत्तमोत्तम गीते गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले.