
नागपूर -प्रतिनिधी
नागपूर, दि. 27 :- शिक्षण संचालक, शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाकडे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आलेल्या आहेत.
यासोबतच शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयामार्फत आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता नववी ते बारावी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता नववी ते बारावी मधील विद्यार्थी) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता नववी व दहावी मधील विद्यार्थी) या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या सर्व योजनांमधील पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीत एनएसपी 2.0 पोर्टलवर (www.scholarships.in) 31 ऑक्टोबरपूर्वी अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ही योजना मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारसी व जैन या समाजातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनामधील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावी मधील पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. यासाठी मागील इयत्ता मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक, पालकांचे उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असावे, एका कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांना लाभ, 30 टक्के मुलीसाठी राखीव, इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा इत्यादी अटी व शर्ती आहेत.
या योजनेसाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याचा धर्मनिहाय कोटा 2 लाख 85 हजार 451 निश्चित केला आहे. सद्यस्थितीमध्ये नवीन मधून 3 लाख 82 हजार 514 अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच नुतनीकरण मध्ये 7 लाख 84 हजार 251 पैकी 7 लाख 24 हजार 495 इतके अर्ज एनएसपी 2.0 पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झाले आहेत. शिष्यवृत्ती रक्कम एक ते वीस हजार रुपये देण्यात येते. सर्व योजनांसाठी तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. नुतनीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांने अर्ज भरणे आवश्यक आहे.