Breaking News

शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’

बल्लारपूर येथे बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी विद्यापीठासाठी जागेची पाहणी

मूल येथे उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 3 : बल्लारपूर तालुक्यातील बॉटॅनिकल गार्डनचे प्रस्तावित लोकार्पण 25 डिसेंबर 2022 रोजी करण्याचे प्रयोजन आहे. त्यासंदर्भात येथे सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच प्रस्तावित एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जागेची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी गुरवारी बल्लारपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. तसेच सर्व यंत्रणांनी आपले काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

पुढील शैक्षणिक सत्रापासून म्हणजे जून महिन्यापासून बल्लारपूर येथे एसएनडीटी या महिला विद्यापीठाची शाखा सुरू करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. विद्यापीठामार्फत राबविले जाणारे सर्व शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात नगर परिषदांच्या शाळेची व उपलब्ध जागेची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली.

यावेळी मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, कार्यकारी अभियंता (सा.बां) श्री. भास्करवार, श्री. बालपांडे कार्यकारी (महावितरण), न.प. अतिरिक्त मुख्याधिकारी श्री. काटकर व इतर अधिकारी उपस्थित होते

मूल व सावली तालुक्याचा आढावा :

महसूल, ग्रामविकास, कृषी, नगर विकास व इतर विभागाच्या महत्वाकांक्षी योजनांबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी गुरवारी मूल आणि सावली तालुक्याचा मूल येथील उपविभागीय कार्यालयात आढावा घेतला. तालुकास्तरावर या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

यावेळी मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रवींद्र होळी, गटविकास अधिकारी देव गुणावत, ठाणेदार सतिशसिंह राजपूत, सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील, गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिका-यांनी आसोलामेंढा धरणाची उंची वाढविणे, त्यामुळे होणारे परिणाम व उपाययोजना बद्दल आढावा घेतला. तसेच चिचडोह बॅरेजबदद्दल माहिती जाणून घेतली. मूल व सावली तालुक्यात मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेने उपाययोजना कराव्यात. कृषी विभागाने रबी हंगामक्षेत्र वाढीकरीता योग्य नियोजन करावे. पीएमकिसान मधील शिल्लक लाभार्थ्यांना गावनिहाय शोधून त्यांच्यापर्यंत पोहचणे आणि योजना सर्वव्यापक करणे, अतिवृष्टी पीक नुकसान अनुदान 100 टक्के लाभार्थ्यांच्या खात्यात टाकणे आदींबाबत यंत्रणेला सुचना केल्या.

यावेळी त्यांनी मूल मधील मूल मारोडा कृषी महाविद्यालयाची प्रस्तावित जागा व मालधक्का संदर्भात चर्चा करून प्रत्यक्ष जागेची पाहणी करून विषय समजावून घेतले. रोहयो अंतर्गत मामा तलाव तोलेवाही येथेही कामासंदर्भात त्यांनी पाहणी केली.

००००००

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वन्य प्राण्याच्या त्रासाने बळीराजा चिंतेत वनविभाग मात्र गाढ झोपेत

वनविभागाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात उभ्या पिकात रोहयाचा आणि रान …

व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता संयुक्त पथक गठीत

तपासणी अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved