Breaking News

पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे सिपेट आणि हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 11 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे चंद्रपुरातील सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) व सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट, कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीस केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

नागपूर येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करतांना पंतप्रधानांनी चंद्रपूर येथील कौशल्य विकासावर आधारी रोजगार देणारी सिपेट आणि वैद्यकीय संशोधन करणा-या हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरचे रिमोट दाबून लोकार्पण केले. या कार्यक्रमाला चंद्रपूर येथे केंद्रीय रसायने व पेट्रोलियम मंत्रालयाचे सहसचिव दीपक मिश्रा, सिपेटचे महासंचालक शिशिर सिन्हा, चंद्रपूर सिपेटचे संचालक अवनीध जोशी, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता हेमंत कुलकर्णी, सिपेटचे तांत्रिक संचालक  मूर्ती, प्रशासकीय अधिकारी पंकज वाघमारे आदी उपस्थित होते.

यावेळी नागपूरवरून दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, नागपूरात आज 11 योजनांचे लोकार्पण होत आहे. यात चंद्रपूरातील दोन संस्थांचा समावेश आहे. सिपेटद्वारे रोजगार निर्मिती आणि हिमोग्लोबिनोपॅथीस सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनात नवी दिशा मिळणार आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवेचा विकास हा सामुहिकरित्या होणे गरजेचे आहे. तरच वंचित घटक विकासाच्या प्रक्रियेत येऊ शकतात. चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत गमावू शकत नाही. या संधीचे सोने करण्यासाठी स्थायी विकास महत्वाचा आहे. त्यासाठी आपल्या पायाभूत सुविधा अद्यावत करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

तत्पुर्वी चंद्रपूर येथे सिपेटचे महासंचालक  सिन्हा म्हणाले, या संस्थेचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. चंद्रपूर येथील सिपेट ही संस्था देशातील 46 वी संस्था आहे. 54 वर्षात या संस्थेने कौशल्य विकासावर आधारीत रोजगाराभिमुख विद्यार्थी घडविले असून प्लास्टिक क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. येथे प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण होणारे 90 टक्क्के विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहे. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने चालणारी ही संस्था चंद्रपूर व आदिवासी क्षेत्रासाठी रोजगाराची नवी संधी आहे, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनींनी स्वागत गितावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन शीतल भालेराव यांनी केले. कार्यक्रमाला सिपेटचे तांत्रिक विभाग प्रमुख, सर्व अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सिपेट संस्थेविषयी माहिती : सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यता प्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित संस्था आहे. संपूर्ण भारतात प्लास्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकासाचे काम करत आहे. तसेच प्लास्टिक क्षेत्रातील आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी प्रशिक्षण, तांत्रिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.

महाराष्ट्रात चंद्रपूर येथे प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी सिपेट संस्था सुरु करण्यात आलेली आहे. सद्यस्थितित सिपेट, चंद्रपुर येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या डिप्लोमा कोर्सेसमध्ये तीन वर्ष कालावधी असलेले डिप्लोमा इन प्लास्टिक्स टेक्नोलॉजी (DPT) आणि डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड टेक्नोलॉजी (DPMT) हे दोन कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच विदेशात देखील बहुराष्ट्रीय प्लास्टिक उद्योग (मल्टीनेशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज) मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत.

तसेच सिपेट चंद्रपूरमधून कौशल्य विकास योजनांतर्गत आतापर्यंत जवळपास 4280 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आणि त्यापैंकी 3722 म्हणजेच 87 टक्के विद्यार्थ्यांना टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम लि., वॅरोक पॉलीमर प्रा.लि., जाबील सर्किट इंडिया प्रा.लि., आरसी प्लास्टो प्रा.लि. या व इतर नामांकित कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved