
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नागपूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला असून आज या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ.सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली असून आमदार सौ.सरोज अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे कामकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सौ.सरोज अहिरे यांच्या कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले होते.
आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार सौ.अहिरे यांच्या हस्ते करावे असे मत काल त्यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार सकाळी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी सोबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.