
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
भिसी : ” 2016 पासून भिसीत कुस्ती व कबड्डीच्या विदर्भस्तरीय सामन्यांचे दरवर्षी आयोजन केले जाते.त्यानिमित्त विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातून खेळाडू भिसी नगरीत येतात. या पारंपारिक, मैदानी, ग्रामीण खेळांना ग्रामीण भागातून हद्दपार होता – होता हनुमान व्यायाम मंडळा व जोड मारोती देवस्थानाने वाचविले. याचे श्रेय इंजिनिअर गजेंद्र चाचरकर, मनोज दिघोरे व मंडळाच्या कार्यकर्त्यांना जाते. त्यांनी यापेक्षाही मोठे आयोजन करावे, भिसी नगर पत्रकार संघ आयोजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे, पुढेही राहिल. कारण, भिसी नगरीत होणारे पारंपारिक कुस्ती व कबड्डी सामने भिसीवासीयांसाठी गौरवाची बाब आहे, ” असे प्रतिपादन प्रा. आनंद भिमटे यांनी केले.
मकर संक्रांतीच्या पर्वावर, 15 जानेवारीला भिसी येथील श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानाच्या भव्य प्रांगणात कुस्ती दंगलीचे आयोजन हनुमान व्यायाम मंडळ व जोड मारोती देवस्थान भिसीचे वतीने करण्यात आले.दुपारी साडेबारा वाजता कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्याप्रसंगी भिसी नगर पत्रकार संघाचे प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.कुस्ती दंगलीचे उदघाट्न ग्रामविश्व संघर्ष वाहिनीचे संयोजक इंजि. गजेंद्र चाचरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रदेश संघटक ( ओबीसी विभाग ) धनराज मुंगले, प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. सतीश वारजूकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हा सचिव व भिसीचे माजी सरपंच अरविंद रेवतकर, भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश राऊत, सहकार नेते घनश्याम डुकरे, माजी जि. प. सदस्या ममता डुकरे, सामाजिक कार्यकर्ते सचिन गाडीवार,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य विजय घरत, ज्येष्ठ नाट्य कलावंत अहेमद शेख, माजी पं. स. सदस्य प्रदीप कामडी, ईश्वर डुकरे, भिसी नगर पत्रकार संघांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिरभय्ये, सचिव सारंग भिमटे, सदस्य मनोज डोंगरे, नितीन सवाई, राजू डहारे, रामचंद्र दिघोरे, राजू भिमटे, भोजराज वानखेडे, भोजराज वाघधरे, हर्षल तिडके, उपस्थित होते.
यावेळी चंद्रपूर येथील सय्यद जलील व सय्यद वजीर या पिता – पुत्राच्या जोडीचा पहिलाच सामना रोमहर्षक झाला.मुलाने बापाचा निकाराची झुंज देत पराभव केला. तरीही पराभूत बापाच्या चेहऱ्यावर मुलाच्या विजयाबद्दल कौतुक व समाधान दिसत होते. सामना बघून प्रेक्षकांचेही हृदय उचंबळून आले.
परिसरातील नागरिक शेकडोच्या संख्येने कुस्ती दंगल बघण्यासाठी आले होते.दंगलीत शेकडो पुरुष व काही महिला पहेलवानांनी सहभाग घेतला. विजेत्यांना शाल, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कुस्ती दंगल यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज दिघोरे, उपाध्यक्ष कैलास नागपूरे, सचिव श्यामराव भानारकर, कोषाध्यक्ष दिनेश शिवरकर, सहसचिव विनोद नागपुरे, व्यवस्थापक संजय नान्हे, कार्यकारी मंडळ व सर्व सभासदांनी अथक परिश्रम केले.