Breaking News

वाहन चालविण्याबाबत बालकांनी पालकांचे ‘ब्रेक’ बनावे – पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेसी

34 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 19 : टू व्हिलर चालवताय…. हेल्मेट घाला, फोर व्हिलर चालवताय…..सीटबेल्ट लावा, दारू पिऊन वाहन चालवू नका, अतिवेगाने पळवू नका…..असा तगादा पाल्यांनी त्यांच्या पालकांसमोर लावावा. रस्त्यावर वाहन चालवितांना मुलांचा हा हट्टच पालकांसाठी ‘ब्रेक’ चे काम करेल आणि त्यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हा पोलिस अधिक्षक रवींद्रसिंह परदेसी यांनी मुलांकडून व्यक्त केली.

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात 34 वा रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप करतांना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, वरिष्ठ न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमीत जोशी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना आणि नातेवाईकांनासुध्दा वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला लावावे, असे सांगून पोलिस अधिक्षक परदेसी म्हणाले, दुचाकीवर हेल्मेट, चारचाकी चालवितांना समोर असलेल्यांनी सिटबेल्ट लावणे अनिवार्य आहे. तसेच वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवावे. दारू पिऊन किंवा वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करू नये. पोलिस विभाग किंवा उप-प्रादेशिक विभाग हा दंड ठोठावण्यासाठी नाही तर नियमांचे पालन करून घेण्यासाठी रस्त्यावर उभा असतो. नियमांचे पालन करून कुटुंब वाचावे, हा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आणि त्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत संदेश पोहचविणे याकरीता वर्षभर ही मोहीम राबविण्यात येईल. गत पाच वर्षी जिल्ह्यात 31 डिसेंबरला अपघाताची श्रृंखला राहिली आहे. मात्र 31 डिसेंबर 2022 हा दिवस जिल्ह्यात अपघातमुक्त ठरला. जनजागृतीचा हा परिणाम आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पथनाट्य सादर करणा-या मुलांचे कौतुक केले.

न्या. सुमीत जोशी म्हणाले, वेग कुठे आणि किती असावा, याचे भान ठेवा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात वेग ठेवावा. रस्त्यावर वेग ठेवला तर अमुल्य जीवन गमावून बसाल. वाहतुकीबाबत हिरवा, पिवळा आणि लाल रंगाचे विशेष महत्व आहे. त्याची जाणीव ठेवा. विनाकारण घाई करू नका. जिल्ह्यातील शाळांमध्ये येऊन विविध कायदेविषयक बाबींवर आपण मार्गदर्शन करणार आहोत, असे ते म्हणाले.

तर अपर जिल्हाधिकारी देशपांडे यांनी अमेरिका आणि इंग्लड देशातील वाहतुकीच्या ‍नियमाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रगत देशात लहान पणापासूनच वाहतुकीच्या नियमांबाबत अवगत केले जाते. आपल्या देशात रस्त्यावर आपली वर्तणूक चांगली नाही. शिस्तीत राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या माध्यमातून पालकांपर्यंत अतिशय चांगला संदेश पोहचविता येतो. अपघातामुळे कृत्रिम अवयव लावण्याची पाळी येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण : 34 वा रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त उप-प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कांचन चैतराम मसराम (भवानजीभाई चव्हाण हायस्कूल), द्वितीय क्रमांक ख्रिष्टी धनसिंग ताडामी (प्रियदर्शनी कन्या विद्यालय, बगडखिडकी चंद्रपूर), तृतीय क्रमांक गौरी सुधीर भरडकर (लोकमान्य टिळक कन्या विद्यालय), चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक जान्हवी सोनवणे (न्यू डॉन पब्लिक स्कूल),द्वितीय वेदांती शरद भलवे (भवानजीभाई चव्हाण हायस्कूल), तृतीय दिव्यानी प्रकाश चौधरी (भवानजीभाई चव्हाण हायस्कूल), तर उत्कृष्ट मॉडेल सादरीकरणात प्रथम क्रमांक अनुष्का येवले (न्यू डॉन हायस्कूल), सुहास आत्राम (भवानजीभाई चव्हाण हायस्कूल) आणि तृतीय क्रमांक योगराज गणेश सिंग (न्यू डॉन हायस्कूल) यांना मिळाला. यावेळी भवानजीभाई चव्हाण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले. संचालन नासीर खान यांनी तर आभार वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, मोटार निरीक्षक अमोल मांढळे यांच्यासह कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved