
बरडघाट शाळेत वार्षिक स्नेह संमेलन निमित्त आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-भारतातील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला मुख्याध्यापिका,महामानवी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध प्रसंगातून प्रेक्षकांशी संवाद साधत उपक्रमशील शिक्षक संजय सर यांनी त्यांच्या भावनांना हात घातला.प्रत्यक्ष सावित्रीमाई फुले संवाद साधत असल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.प्रसंग होता ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोगाचा. चिमूर तालुक्यातील बरडघाट जि.प.प्रा. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. भारतातील महिलांच्या उद्धारक सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.उपक्रमशील शिक्षक संजय सर यांनी ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोगातून सावित्रीमाईंच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध प्रसंग सादर केले.
शाळा सुरु करताना, शिकवायला जाताना झालेला प्रचंड त्रास,मानहानी यांची पर्वा न करणाऱ्या, प्लेगची साथ आल्यावर रोग्यांना पाठीवर मांडून नेणाऱ्या,समाजाकडून हेटाळणी होणाऱ्या विधवांसाठी लढणाऱ्या महामानवी सावित्रीमाई प्रेक्षकांसमोर संजय सर यांनी प्रत्यक्ष उभी केल्या. त्यांच्या जिवंत अभिनयाने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.सावित्रीमाईंनी केलेल्या कार्याची आपण जाणीव ठेवायला हवी,त्यांचे कार्य आपण पुढे न्यायला हवे हा संदेश या एकपात्री प्रयोगातून संजय सर यांनी दिला.आपण सादर केलेला हा पहिलाच प्रयोग आहे आणि पहिल्याच प्रयोगाला फार मोठा प्रतिसाद मिळाल्याचे याप्रसंगी संजय सर यांनी आवर्जून सांगितले.
शाळा व्यवस्थापण समिती,गुरुदेव सेवा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सपत्नीक शाल, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी केंद्रप्रमुख पांडुरंग भोरे,मुख्याध्यापक सुरेश डांगे,अर्चना डफ,कवडू बारेकर,हरिभाऊ रिनके,सुरेश सहारे,प्रभाकर दोडके,रामभाऊ मेश्राम,जया दोडके, कल्याणी दोडके,आशा पोईनकर,उषा दोडके,स्वप्नील श्रीरामे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाला विद्यार्थी, महिला,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.