
कठीण परिश्रमाणे यश संपादन करता येते : शालू घरत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-लोकसेवा आयोगामार्फत अलीकडेच जाहीर झालेल्या निकालात चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या लहानशा गावातील शालू शामराव घरत या विद्यार्थीनीने बाजी मारली असून तिची उद्योग निरीक्षक या पदावर नेमणूक होणार आहे. गट क मध्ये ती अनुसूचित जमातीत राज्यात पहिली आली आहे.
गरीब कुटुंबातील शालूचे यश नेत्रदीपक असेच आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेऊन तिने हे यश संपादन केले आहे. वडिलांचे पहिल्या वर्गातून शिक्षण सुटले. घरी चार भाऊ. दोन एकर शेती. अशाही परिस्तिथीत वडिलांनी शालूच्या शिक्षणासाठी मोलमजुरी करुन तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
शालू महाराष्ट्र राज्य लोकसेवा परीक्षेत राज्यात अनुसूचित जमातीतून प्रथम आली.तिच्या यशाबद्दल वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे तिच्या घरी जावून तिचा सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. पुढील कारकिर्दीकरिता तिला शुभेच्छा देण्यात आल्या.सत्काराला उत्तर देताना माझे यश कठीण परिश्रमामुळे शक्य झाले.ध्येय गाठायचे असेल तर अविश्रांत मेहनत आणि जिद्द असावी लागते. माझ्या परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी माझ्या माध्यमातून पुढे जे करता येणे शक्य होईल ते मी करेन. मात्र परिस्तिथीपुढे हतबल न होता मेहनत करणे आवश्यक असल्याचे शालू घरत हिने प्रतिपादन केले.
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे, सदस्य हरी मेश्राम, रावण शेरकुरे, कैलास बोरकर,सामाजिक कार्यकर्ते शंकरराव घरत,नितीन पाटील, रवींद्र बारेकर,महादेव सूर्यवंशी,पांढरवाणी शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम पंधरे तथा शालूचे आईवडील याप्रसंगी उपस्थित होते.