Breaking News

मास्कचा वापर न करणाऱ्यांना आता ५०० रुपयाचा दंड

मनपाचे नवे आदेश जारी : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी कडक पाऊल

नागपूर, ता.१४: कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी नागपूर शहरात प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. यासाठी पूर्वी २०० रुपयांचा दंड आकारण्यात येत होता. आता हा नियम अधिक कडक करण्यात आला असून नव्या नियमानुसार ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

यासंबंधीचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (ता.१४) जारी केले. २०० रुपये दंडाची तरतूद केल्यानंतरही नागपूर महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी, वाहतूक करताना व इतर ठिकाणी बऱ्याच व्यक्ती फेस मास्कचा वापर न करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू संक्रमणाची परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता मास्क वापराचे गांभीर्य तयार व्हावे व नागरिकांनी जबाबदारीने त्याचे पालन करावे यासाठी दंडात्मक रक्कमेत वाढ करणे आवश्यक असल्याचे मत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. हे लक्षात घेऊन साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीच्या अनुषंगाने नागपूर शहर सीमेत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयाच्या ठिकाणी व वाहतूक करताना फेस मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर यापुढे ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. हे आदेश नागपूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बस स्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थान, बगीचे, पर्यटन स्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी, आवारातही लागू राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध व निर्मुलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधित झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे अधिकारी, नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी तसेच इतर सर्व कार्यालयांमध्ये संबंधित आस्थापना कार्यालय प्रमुखांनी प्राधिकृत केलेले अधिकारी, कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.

मास्क न लावणा-या ७४४ नागरिकांकडून दंड वसूली

अकरा दिवसात ५०३२ विरुध्द कारवाई

महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी सोमवार (१४ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ७४४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लक्ष ४८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील अकरा दिवसात शोध पथकांनी ५०३२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. १०,०६,४००/- चा दंड वसूल केला आहे.

लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ५२, धरमपेठ झोन अंतर्गत १०१, हनुमाननगर झोन अंतर्गत १६१, धंतोली झोन अंतर्गत ८६, नेहरुनगर झोन अंतर्गत २३, गांधीबाग झोन अंतर्गत ३४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ७७, लकडगंज झोन अंतर्गत ३२, आशीनगर झोन अंतर्गत ९५, मंगळवारी झोन अंतर्गत ७६ आणि मनपा मुख्यालयात ७ जणांविरुध्द सोमवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

आतापर्यंत अकरा दिवसात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३९७, धरमपेठ झोन अंतर्गत १११०, हनुमाननगर झोन अंतर्गत ४९५, धंतोली झोन अंतर्गत ५३६, नेहरुनगर झोन अंतर्गत ३११, गांधीबाग झोन अंतर्गत ३३९, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ३३५, लकडगंज झोन अंतर्गत ३१६, आशीनगर झोन अंतर्गत ५०८, मंगळवारी झोन अंतर्गत ६४४ आणि मनपा मुख्यालयात ४१ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved