
नागपूर- देश विदेशातील लाखो अनुयायांचे प्रेरणास्थळ असलेल्या दिक्षाभुमी स्मारक येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम साजरा केला जातो परंतु यंदा मोजक्या व्यक्तींच्या उपस्तिथीत साधेपणाने धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा होणार आहे. या वर्षीचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने घेतला आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण आणि खासकरून नागपूरची स्थिती पाहता समितीने हा निर्णय घेतला आहे.
यावर्षी 25 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नागपूरच्या दीक्षाभूमीवर होणार होता. दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी हा सोहळा होतो आणि राज्यातून व देशातून लाखो लोक दीक्षाभूमीवर परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा सर्व कार्यक्रम रद्द केले असून लोकांनी नागपूरला येऊ नये असे आवाहन एका पत्रकाद्वारे डॉ. बाबासाहेब स्मारक समितीचे सचिव डॉ.सुधीर फुलझेले यांनी केले आहे.