
नागपूर दि.16 : नागपूर येथे अमरावतीच्या एका प्रवाश्यांची 5 लाख रूपयाने भरलेली बॅग प्रवाशाला शोधून परत करणाऱ्या प्रामाणिक ऑटो चालकाच्या पाठीवर जिल्हा प्रशासनाने आज कौतुकाची थाप दिली. कुद्दुस खान नावाच्या या ऑटो चालकाचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शाल व श्रीफळ देऊन कौतुक केले.
कुद्दुस खान यांच्या ऑटोरीक्षात एक प्रवासी आपली बॅग विसरला होता. प्रवास संपल्यानंतर ही बॅग ऑटोमध्ये राहिल्याचे लक्षात आले. कुद्दुस खान यांनी त्या प्रवाश्याचा शोध घेत त्यांची बॅग परत केली.
अशा घटनांमुळे सामाजातील प्रामाणिकपणाला चालना मिळते. गरीब ऑटोरीक्षा चालकांनी एवढी मोठी रक्कम प्रामाणिकपणे परत करणे ही नागपूर शहरासाठी तसेच नागपूर शहरातील ऑटो चालकांसाठी गौरवास्पद बाब आहे. शहरातील ऑटो चालकांच्या चांगल्या वागणुकीची दखल अन्य ठिकाणावरून प्रवास करणारे नागरिक घेत असतात. त्यावरून शहराची ओळख ठरत असते. त्यामुळे अशा पद्धतीच्या वागणुकीतून शहराला चांगली ओळख व शहराच्या नावाला सन्मान मिळते. कुद्दुस खान यांचा आम्हाला गर्व असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
या प्रसंगी विदर्भ ऑटोरीक्षा चालक फेडरेशन अध्यक्ष विलास भालेकर, राजू इंगले, प्रिन्स इंगोले, टायगर ऑटोरीक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख, रवी सुखदेवे, महासचिव प्रकाश साखरे, संघटक सय्यद रिजवान उपस्थित होते.