Breaking News

भूमाफियांवर वचक निर्माण करणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाची नागपुरातून सुरुवात

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समक्ष 8 प्रकरण निकाली
  •  शिबीरात अद्यापपावेतो 300 तक्रारी प्राप्त

नागपूर, दि.19 : नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये विविध आमिष, दबाव व दहशत निर्माण करून कोट्यवधी रुपयांचे भूखंड बळकावून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते. असे कृत्य करणाऱ्या असामाजिक तत्वांवर वेळीच निर्बंध आणणाऱ्या विशेष तक्रार निवारण शिबिराचा पहिला पथदर्शी उपक्रम गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत आज नागपुरात पार पडला. यामध्ये गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत 50 तक्रार धारकांपैकी 8 तक्रारींसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले. राज्याच्या अन्य भागातही हा प्रकल्प लाभ घेण्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिले आहे.


पोलीस जिमखाना येथे ‘विशेष तक्रार निवारण शिबीरा’चे उद्घाटन गृहमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘विशेष तक्रार निवारण शिबीर’ हा राज्यातील भूमाफियांना निर्बंध घालणारा पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. या शिबीराच्या माध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करुन नागरिकांच्या तक्रारींचा त्वरीत निपटारा करण्यात येईल. शहरातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस चमू उत्तम कामगिरी करीत आहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार इतर शहरातदेखील विशेष तक्रार निवारण शिबीर राबवणार येईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केले.


या शिबीरात अद्यापपावेतो 300 तक्रारी प्राप्त झाल्या असून पहिल्या टप्प्यातील 50 तक्रारदारांना आज शिबीरात निमंत्रित करण्यात आले होते. यापैकी 8 तक्रारींवर आज शिबीरातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उरलेल्या दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिली.


विशेष तक्रार निवारण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, दिलीप झळके, नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विवेक मसाळ, नुरल हुसैन, विनीता साहू, गजानन राजमाने, श्री. निलोत्पल, बसवराज तेली, अक्षय शिंदे, विक्रम साळी तसेच शासकीय विभागाचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुख्य अभियंता सुनिल गुझलवार, सहकार विभागाचे ए.बी. कडू, मुद्रांक नोंदणी विभागाचे अ.स. उघडे, महानगरपालिका उपआयुक्त मिलिंद मेश्राम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस चमू चांगले काम करीत आहेत. वाढत्या गुंडगिरीला जेरबंद बसविण्यासाठी अनेक असामाजिक तत्त्वांवर मोका लावण्यात आला. तर काहींना तडीपार करण्यात आले आहे. तरी देखील भूखंडाच्या बाबतीत फसवणूक, क्रिकेट बुकी, हवाला ऑपरेटर, डब्बा ट्रेलर, अवैध गोरखधंद्यांना आळा घालून वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसावा व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण युध्द पातळीवर करण्यात यावे, यासाठी विशेष तक्रार निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला नागरिकांनी देखील सुसंवाद साधून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या शिबीराच्या संकल्पनेच्या माध्यमातून पोलीस तसेच नागरिक यांच्यातील संबंध अधिक वृध्दिंगत होतील, असा विश्वास गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

विशेष तक्रार निवारण शिबीरात गुंडगिरी, भूमाफिया, अवैध व्यवसाय, डब्बा ट्रेलर, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, अतिक्रमण करणे, अवैधरित्या मालमत्तेवर ताबा मिळविणे अशा स्वरुपाच्या तक्रारी आल्यात. नागरिकांनी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी त्यासंबंधीत संस्थेची खातरजमा करावी. कोणत्याही आमिषांना तसेच भुलथापांना बळी पडू नये. तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस आढळल्यास तक्रार करावी, त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले. ते पुढे म्हणाले, नागरिकांकडून आपआपल्या वसाहतीतील गुंड प्रवृत्तीच्या असामाजिक तत्वांची माहिती 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान मागविण्यात आली होती. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या गुंडांवर वचक बसविण्यात आला. नागरिकांना भयमुक्त जगता यावे यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाचे झोनल अधिकारी यांच्या समन्वयाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. दिवसेंदिवस सायबर क्राईमचे देखील अनेक गुन्हे घडत आहेत. या अंतर्गत महिलांवर दडपण आणून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढत आहेत. तसेच सामाजिक तेढ निर्माण करणे, चुकीचा संदेश देणे ही प्रवृत्ती बळावत आहेत. यासाठी सायबर क्राईम विभागामार्फत कठोर कारवाई करण्यावर भर देण्यात येईल. तसेच पांढरपेशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येतील. या कार्यक्रमात शहराच्या विविध भागातील भूमाफियांच्या कारवाईबाबत नागरिकांनी थेट तक्रारी केल्यात. या संदर्भात पोलीसांच्या नोंदी, नागरिकांच्या तक्रारी, त्याची वस्तूस्थिती यावर चर्चा झाली. 8 केसेसमध्ये पोलींसाकडून जागेवरच कारवाई करण्यात आली.

प्रास्ताविकेमध्ये अमितेश कुमार यांनी गृहमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून नागपूर शहर पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष तक्रार निवारण शिबीरातून तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. गुन्हेगारांवर वचक बसविणे तसेच नागरिकांना दिलासा देणे हे पारदर्शक प्रशासनाचे कार्य आहे. यासाठी नागपूर पोलीस विभाग नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन विवेक मसाळ तर आभार सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांनी मानले. यावेळी तक्रारदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नागपूरला प्रथम पुरस्कार

  मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनपा आयुक्तांना पुरस्कार प्रदान नागपूर, ता. २० : राज्यातील नागरी स्थानिक …

दहा वर्षापूर्वीच्या आधारकार्डचे अद्यावतीकरण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन  

नागपूर, दि.20 : दहा वर्षांपूर्वीच्या आधार कार्डचे अद्यापही अद्यावतीकरण केले नसलेल्या नागरिकांनी तात्काळ ही प्रक्रिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved