
- पहिल्या टप्प्यात शहरात 4 लाख 97 हजार 287 गृहभेटी, 56 जण बाधीत
- ग्रामीणमध्ये 5 लाख 9 हजार 121 गृहभेटी, 1098 बाधित.
नागपूर, दि. 23: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर शहरातील 25 लाख 79 हजार 807 लोकसंख्येपैकी 17 लाख 59 हजार 938 नागरिकांची तपासणी करण्यात असून 4 लाख 97 हजार 287 गृहभेटी घेण्यात आल्या आहेत. तर ग्रामीण भागात 23 लाख 17 हजार 34 लोकसंख्येपैकी 21 लाख 88 हजार 804 नागरिकांची तपासणी करून 94.47 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. शिवाय 5 लाख 9 हजार 121 गृहभेटी घेण्यात आल्या आहेत. यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत 11 हजार 708 तर ग्रामीण भागात 1 हजार 841 आरोग्य तपासणी पथके नेमण्यात आले आहेत.
कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आरंभ पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते 15 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता.
या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका, वैद्यकीय सहायक, गट प्रवर्तक, शिक्षक, अंगणवाडी सेविका सर्व ग्रामपंचायती सहकार्य करीत आहेत. या क्षेत्रातील सर्वांच्या सहभागाने शहरात 5 लाख 47 हजार 267 घरांपैकी 4 लाख 97 हजार 287 घरी प्रत्यक्ष भेट देवून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या नियोजनासाठी नागपूर शहराचे एकूण 10 झोनमध्ये विभाजन करण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात 5 लाख 11 हजार 484 घरांपैकी 5 लाख 09 हजार 121 घरी भेट देवून आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले.
शहरात पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात सारी, आयएलआयचे 4 हजार 452 संशयित आढळून आले होते. तेव्हा खबरदारी म्हणून या संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्यातील 56 जण कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. ग्रामीण क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात 1 हजार 412 संशयित आढळून आले होते. तेव्हा खबरदारी म्हणून त्यांचेसह एकूण 2 हजार 335 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 1098 जण बाधीत असल्याचे आढळून आले. या बाधितांवर वेळीच उपचार करण्यात आल्याने कोरोना श्रृंखला तोडण्यासह मृत्यूदर कमी करण्याची या अभियानामागची शासनाची संकल्पना पुर्णत्वास येत आहे.
ग्रामीण भागात ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यात आतापर्यंत 13 लाख 58 हजार 283 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून 738 संशयितांपैकी 106 कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.
शहर तसेच ग्रामीण भागात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. सर्वेक्षणात आढळून आलेल्या बाधितांवर वेळीच उपचार करण्यात येत आहेत. हे अभियान 25 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे .
बरेचशे रुग्ण अंतिम क्षणी रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी पाहिजे तसा कालावधी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी आपले आजार न लपविता आरोग्य पथकाला सहकार्य करावे व कोरोनाचा संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले आहे.