
आम आदमी पार्टी ची मागणी
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- सरकारने धानासाठी हमीभावाने दिलेला भाव हा समाधानकारक नसून या वर्षी पावसाच्या अनियमिततेने व मावा-तुडतुड्या, लाल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे धानाचे सरासरी उत्पन्न कमी झाले असून झालेल्या नुकसानीबद्दल शेतकरी निराश आहेत. दुसरीकडे, मागील दोन कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांची कर्ज माफी झालेली नाही. शेतकऱ्यांचे देणे-घेणे बाकी असल्यामुळे व धान्य साठवून ठेवण्याची सोय नसल्यामुळे त्यांना अतिशय कमी किमतीत धान विकावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांची हि अडचण समजून घेवून धानाचा त्वरित बोनस जाहीर करावा तसेच हमीभाव जास्त वाढवून द्यावा याकरिता चिमूर विधानसभेत आम आदमी पार्टी तर्फे प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना चिमूर तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्वरित धानाला बोनस जाहीर करावा, नुकसान झालेल्या पिकांसाठी दिल्ली सरकार प्रमाणे प्रती हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करावी. ज्या शेतकऱ्यांना मागच्या दोन कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्यांना कर्ज माफी देण्यात यावी या मागण्या केल्या आहेत. याप्रसंगी आम आदमी पार्टी चिमूर तालुका अध्यक्ष आदित्य पिसे, सचिव विशाल इंदोरकर, युवा अध्यक्ष मंगेश शेंडे, विशाल बारस्कर, व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.