
नागपूर, ता. ३० : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शासणाने मतदारांना एक दिवसाची नैमित्तिक रजा मंजूर केली आहे. मात्र ही रजा जर मतदाराने मतदान केले तरच मंजूर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी असलेल्या सहायक निवडणूक निर्णय आशिकारी यांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून सहायक निवडणूक निर्णय आशिकाऱ्यांनी हा आदेश नागपूर विभागासाठी ११ नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे. ही विशेष नैमित्तिक रजा कर्मचाऱ्यांना मंजूर असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदाराने मतदान केल्यानंतरच ही रजा मंजूर होईल. मतदारांना मतदान केल्याचा पुरावा कार्यालयात द्यावा लागणार असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे मतदारांना या सुटीचा फायदा घ्यायचा असेल तर मतदान करणे अनिवार्य आहे.