Breaking News

पदवीधर निवडणुकीत अंदाजे 55 टक्क्यांपर्यंत मतदान

  • 3 डिसेंबरला मतमोजणी होणार
  • 19 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
  • निवडणुकीत शहरी भागात उत्साह
  • कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित कार्यवाही

नागपूर, दि. 1: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज झालेल्या निवडणुकीत 55 टक्के मतदानाचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यत निवडणूक विभागामार्फत यासंदर्भातील अंतिम आकडेवारी उपलब्ध होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या 19 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. मंगळवार, (दिनांक 3 डिसेंबर) रोजी सकाळी 8 वाजतापासून विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

विभागात 2 लाख 6 हजार 454 नोंदणीकृत मतदार आहेत. त्यातील सर्वाधिक मतदार हे नागपूर जिल्ह्यात असून सर्वात कमी मतदार 12 हजार 448 गडचिरोली जिल्ह्यात आहेत. वर्धा 23 हजार 28, भंडारा 18 हजार 434, गोंदिया 16 हजार 934 तर चंद्रपूर 32 हजार 761 मतदार आहेत.

या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात आहेत. ॲङ अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लि क पार्टी ऑफ इंडीया), इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष), अमित मेश्राम (अपक्ष), प्रशांत डेकाटे (अपक्ष), नितीन रोंघे (अपक्ष), नितेश कराळे (अपक्ष), डॉ.प्रकाश रामटेके (अपक्ष), बबन ऊर्फ अजय तायवाडे (अपक्ष), ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार (अपक्ष), सिए. राजेद्र भुतडा, प्रा.डॉ.विनोद राऊत (अपक्ष), ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल, शरद जिवतोडे (अपक्ष), प्रा. संगिता बढे (अपक्ष)आणि इंजिनियर संजय नासरे(अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.

आज सकाळी 8 वाजेपासून विभागातील 322 मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली. पदवीधरांच्या या निवडणुकीत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात मोठ्या प्रमाणात मतदार असल्यामुळे सकाळच्या दोन सत्रात नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मतदान झाले.

कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. प्रशासनाने याबाबत केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मतदान केंद्रावर येणा-या प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग करण्यात आले असून, मास्क नसलेल्या मतदारांना मास्कचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 4 ते 5 हा वेळ कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आला होता.
आज झालेल्या मतदानामध्ये सकाळी 8 ते 10 पर्यंत विभागामध्ये 8.16 टक्के, 12 पर्यंत 19.70 टक्के, दुपारी 2 पर्यंत 32.92 टक्के व दुपारी 4 पर्यंत 53.64 टक्के मतदानाची नोंद झाली. विभागात 60.94 टक्के पुरुष आणि 42.36 टक्के महिला मतदारांनी मताधिकार बजावला.

शहरी भागात तरुण मतदारांचा उत्साह दिसून आला. प्रशासनाने 80 वर्षांवरील वयस्क व दिव्यांगासाठी दोन दिवस आधीच घरी जात टपाली मतदानाची मोहीम राबविली होती. तरी देखील आज अनेक ठिकाणी दिव्यांग व जेष्ठांनी मतदानासाठी हजेरी लावली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सिव्हिल लाईन्स येथील मतदान केंद्रावर सपत्नीक तर जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी रविनगरातील दादाजी धुनीवाले येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

वेब कास्टींगव्दारे केंद्रावर निगराणी

भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघाची पाहणी विभाग स्तरावर निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना मुख्यालयात करता यावी, यासाठी वेब कास्टिंग यंत्रणेचा वापर सक्तीचा केला होता. नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागपूरसह इतर पाच जिल्ह्यांमधील मतदारसंघाची पाहणी या वेब कास्टिंग यंत्रणेद्वारे केली जात होती. आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या यंत्रणेद्वारे प्रत्येक केंद्रावर कशा पद्धतीने मतदान यंत्रणा काम करीत आहे. याची पाहणी केली. याच ठिकाणावरून त्यांनी अनेक केंद्रांना सूचनाही केली.
प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष छायाचित्र उपलब्ध होत होते. पदवीधर निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागाची माहिती जाणून घेतली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved