
- मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश
- १०वी आणि १२वी पुरवणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल नाही
नागपूर, ता. ९ : कोव्हिड-१९चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा, विद्यालये ३ जानेवारी २०२१पर्यंत बंदच राहणार आहेत. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी (ता.९) आदेश निर्गमित केले आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये याकरिता शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सुचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत सुरू राहिल. विशेष म्हणजे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पूर्वनियोजित सुरू असणा-या इयत्ता १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणे सुरूच राहतील, असेही आदेशात आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी नियंत्रणात आहे. मात्र जागतिक स्तरावरील कोव्हिडच्या उद्रेकाचे अवलोकन केले असता धोका टाळता येउ शकत नाही. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली दिसून येत आहेत. भारतामध्ये दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोव्हिडच्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता महाराष्ट्रातही तशी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच झालेल्या दिवाळीनंतर नागपूर शहरामध्येही हळुहळू कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुढील धोका टाळण्याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
मागील सुमारे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा १३ डिसेंबर २०२० रोजी सुरू करण्याचा निर्णय मनपातर्फे घेण्यात आला होता. मात्र कोव्हिडची स्थिती आणि संभाव्य धोका लक्षात घेता हा निर्णय बदलून ३ जानेवारी २०२१ पर्यंत शाळा बंदच ठेवण्याचे नवीन आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी यांनी समन्वयन आणि संनियंत्रण करावयाचे आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास संबंधिताविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.