
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी तथा जन माहिती अधिकारी डॉ. दिगंबर मेश्राम व प्रथम अपिलीय अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपुर राज गहलोत यांचेवर माननीय संभाजी सरकुंडे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपुर यांनी अर्जदाराला माहिती न दिल्याच्या कारणावरून डॉक्टर मेश्राम यांच्यावर 25 हजार रुपयांचा दंड तर आरोग्य अधिकारी राज गहलोत यांच्या विरुदध शिस्त भंगाची कार्यवाही ची शिफारस केली. जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचेवर उपरोक्त कार्यवाही न केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 166 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे.
डॉक्टर दिगंबर मेश्राम यांनी ब्लॉक फॅसीलेटर पदाची नियुक्ती करताना सन 2011 मध्ये सौ सुरेखा रामदास ढोक राहणार कवडसी रोडी ही मिरीट लिस्ट प्रमाणे पदाकरिता पात्र असताना सुद्धा मेश्राम यांनी भ्रष्टाचार करून अपात्र व्यक्तीची ब्लॉक फॅसीलेटर या पदावर नियुक्ती केली तेव्हा पासून झालेल्या अन्यायाविरुद्ध सुरेखा ढोक यांनी वारंवार भरती प्रक्रियेची माहिती मागितली मात्र भ्रष्टाचारी डॉक्टर मेश्राम यांनी आज पर्यंत माहिती पुरवली नाही. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता व आयुक्तांकडून तसे आदेश सुद्धा देण्यात आल्यानंतरही आदेशाला न जुमानता डॉक्टर मेश्राम यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे जन माहिती अधिकारी डॉक्टर मेश्राम व प्रथम अपिलीय अधिकारी राज गहलोत यांचेवर क्रमशा पंचवीस हजार रुपये दंड तर शिस्तभंगाची कार्यवाही माननीय माहिती आयुक्त यांचेकडून करण्यात आली. त्यामुळे चिमूर आणि चंद्रपूर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. सौ. सुरेखा रामदास ढोक यांना नोकरी पासून वंचित करणाऱ्या डॉक्टर मेश्राम यांच्यावर दंडात्मक कारवाई नंतर आरोग्य विभाग सुरेखा ढोक यांना नोकरी देणार काय ?