
प्रतिनिधी नागपूर
नागपूर, ता. ६ : नागपूर महानगरपालिकेतर्फे लोकसहभागातून वृक्षारोपण करून शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत आहे. याअंतर्गत राजभवन समोरील सेमिनरी हिल मार्गावरील टी-प्वाईंटजवळील खुल्या जागेवर महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे, शिक्षक दिनाचे औचित्य साधून ७५ शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी आमदार सुधाकर देशमुख, किसन गावंडे, बिहारी शिवहरे, विकास फ्रांसीस, बसंत देशराज, श्रीमती शायरे, राजेश सिरीया यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, भविष्यात कृत्रिम ऑक्सिजन चा तुटवडा पडू नये यासाठी नैसर्गिक ऑक्सिजनची मात्रा वाढविणे आवश्यक आहे. याच संकल्पनेतून ऑक्सिजन झोन हा विचार पुढे आला. ज्या ठिकाणी खुले मैदान आहेत अशा ठिकाणी लोकसहभागातून कमीत कमी २५० आणि जास्तीत जास्त एक हजार वृक्ष लावून ऑक्सिजन झोन तयार करण्यात येत आहेत. यात नागरिकांचा सहभाग उत्स्फूर्त आणि लक्षणीय आहे. विविध भागात एकूण ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचा मागचा हेतू सांगताना त्यांनी ब्रह्मा, विष्णू, महेशचे उदाहरण दिले. शिक्षक हा गुरु आहे. इंग्रजीतील ‘गॉड’ हा शब्द डोळ्यासमोर ठेवूनच शिक्षक शब्दाची निर्मिती झाली असावी, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपस्थित प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लिला आत्राम, सुमन उईके, पूजा कनौजिया, शालिनी रेड्डी, माधुरी फुलसुंगे, वंदना हारोडे, श्याम गहरे, सुधीर कपूर, सुनील धारीवाल, अनिल गाजर्लावार, सुरेश उईके, कंचन शर्मा, क्रांती शर्मा, रोशन पिल्ले, संदीप कचडे, सुधीर आनंद, बंडू पुणेकर, अजय मुखर्जी यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.