
नागपूर दि. 25 : ऐतिहासिक शहर म्हणून नावलौकीक असलेल्या नागपूर शहरात गोंड कालीन व भोसले कालीन अनेक सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु आहे. ज्यामध्ये टिळक पुतळा, विठ्ठल रुखमाई मंदीर (घुई), गांधी दरवाजा (शुक्रवार दरवाजा), रुख्मिनी मंदीर कॉम्पलेक्स, सिनियर भोसले वाडा, बाकाबाईचा वाडा (डी.डी नगर विद्यालय), कोतवाली पोलीस स्टेशन, महाल-बुधवार बाजार-कल्याणेश्वर द्वार, गोंड किल्ला चिटणवीस वाडा, आदीं स्थळांचा समावेश असून या ऐतिहासिक वास्तुची माहिती जनतेला व्हावी, त्याची प्रसिध्दी व्हावी, लोकांना रोजगाराच्या संधी निर्माणा व्हाव्या, यासाठी टूर ऑपरेटर, टू्रव्हल्स एजेंट आणि हॉटेल असोसिएशन यांच्या माध्यमातून हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज येथे दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यटन विभागाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक जया वाहणे, सा.बा. विभागाचे उपअभियंता पराग नगराळे, माजी प्राध्यापक चंद्रशेखर गुप्ता, ताईचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, एनआरएचएचे अध्यक्ष तेजंदरसिंग रेणू, विदर्भ हेरिटेज सोसायटीचे अध्यक्ष प्रद्युम्य सहस्त्रभोजने, सचिव अवंतिका चिटणविस,एडीटीआयओचे आदित्यशेखर गुप्ता यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत ऐतिहासिक धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू, ब्रिटीश रेसिडेन्सी टूर (झिरो माईल व सभोवतालचा परिसर), शहराबाहेरील हेरिटेज सहल असे 4 सर्किट तयार करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. विदर्भ हेरिटेज सोसासयटी यांनी शहरातील ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रासह माहिती असलेली पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेचे लवकरच विमोचन करण्यात येणार आहे, असे यावेळी सदस्यांनी सांगितले.