
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून वचनपूर्ती
नागपूर दि. 29 : संजय गांधी निराधार योजनेसह विशेष सहाय्य योजनेतील सर्व अनुदान दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. जिल्हा प्रशासनाने आज २.९० लक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात आवश्यक अनुदान जमा करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकार्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 21 ऑक्टोबर रोजी या संदर्भात बैठक घेतली होती. आज जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण यादीमध्ये 64 हजार 470, अनुसूचित जाती गटांमध्ये 21 हजार 592, तर अनुसूचित जमाती गटामध्ये 15 हजार 522 लाभार्थ्यांना लाभ जाहीर करण्यात आला. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटात 1 लक्ष 10 हजार 921, अनुसूचित गटात 21 हजार 577 अनुसूचित जमाती गटात 7 हजार 628, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना अंतर्गत 44 हजार 792, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 2 हजार 995, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजने अंतर्गत 95, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 276 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये तर एक अपत्य असणाऱ्या लाभार्थ्यांना दर महा अकराशे, दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या लाभार्थ्यांना बाराशे रुपये देण्यात येतात. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा एक हजार दिले जातात.
नागपूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर 2021 पर्यंतचे अनुदान प्रलंबित होते. हे सर्व अनुदान 30 ऑक्टोंबरपर्यंत दिवाळीच्या आत सामान्य नागरिकांच्या हाती पडेल, यासाठी प्रशासनाला गतिशील करत कार्यपूर्ती करण्याचे निर्देश डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. 21 ऑक्टोबर रोजी संजय गांधी निराधार योजनेतील समितीवर नियुक्त झालेले सदस्य व प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे अनुदान प्रलंबित राहता कामा नये, असे स्पष्ट केले होते.निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी आज यासंदर्भात लाभार्थ्यांची संख्या जाहीर केली आहे. दिवाळीपूर्वी सर्वांना अनुदान प्राप्त होणार आहे.