
– अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना यांच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्याचे निर्देश –
– महानगर क्षेत्रातील विविध विषयांवर बैठकीचे आयोजन –
नागपूर दि. १ : महानगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांची भाडेपट्टी वाढी संदर्भात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेची वसुलीही स्थगित आहे. काही ठिकाणी गुंता न्यायालयात प्रलंबित आहे. यामध्ये मधला मार्ग काढत तातडीने या संदर्भातील निर्णय पुढील पंधरा दिवसात घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
महानगरपालिका क्षेत्रातील विविध विषयांवरील बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकांना आमदार आशिष जायस्वाल,राजू पारवे, जिल्हाधिकारी विमला आर, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमारमिना, राम जोशी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक मोक्याच्या ठिकाणी मनपाच्या मालकीचे गाळे व्यापाऱ्यांकडे आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असणाऱ्या या दुकानांचे भाडे वाढविण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेने रेडीरेकनरचे सूत्र लावले आहे. तथापि, या संदर्भात अनेक व्यापाऱ्यांची नाराजी असून व्यापाऱ्यांची संघटना म्हणून काम करणाऱ्या एन एम सी मार्केट फेडरेशनने आजच्या बैठकीमध्ये आपल्या समस्या पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्यासमोर मांडल्या.
वाढविण्यात आलेली भाडेपट्टी अतिशय जास्त आहे, कोरोना काळामध्ये व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असून या मध्ये घट करण्यात यावी, आदी विविध मागण्या यावेळी व्यापाऱ्यांनी सादर केल्या. व्यापाऱ्यांच्या मागण्या व प्रशासनाचे भाडेपट्टी दर यामध्ये योग्य पर्याय काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी अतिरिक्त आयुक्तांनी पंधरा दिवसात सन्मानपूर्वक तोडगा काढावा असे निर्देश दिले.
आजच्या बैठकीत महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाला आरोग्यासंदर्भात राबवायच्या हेल्थ कार्ड तसेच अति जोखमीच्या आजाराचे ( कोमॉरबीड ) सर्वेक्षण करण्यासंदर्भात चर्चा झाली. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुसूत्रता आणून या दोन्ही प्रकल्पाला पुढे नेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.व्ही. पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. सेलोकर यांच्यासह महानगरपालिका आरोग्य यंत्रणेचे अधिकारी सहभागी झाले होते.
गेल्या आठवड्यात नागपुरातील अनेक भागांमधील जलकुंभाचे अर्थात पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात तक्रारी आहेत. तसेच काही ठिकाणचे लिकेज दूर झाले नसल्याबाबतचे त्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी नारा व वांजरा या भागातील पाणीपुरवठा पुढील आठवड्यात व्यवस्थित करण्याबाबत आश्वस्त केले. आशीनगर, सतरंजीपुरा येथील नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याबाबत त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडण्याबाबत एक शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटून गेले. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी शिष्टमंडळाच्या सर्व समस्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आली आहे, असे स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच करण्यात आले. तसेच महागाई भत्ता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ कशी होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन, यावेळी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण यांनी केले.
आजच्या बैठकीत डॉ ना.सु. हर्डीकर यांच्या पुतळ्या संदर्भातही आढावा घेण्यात आला. या बैठकीला डॉ.ना. सु. हर्डीकर स्मृती प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय सीताबर्डी येथील जुनी पुस्तके विक्रेत्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात गेल्या बैठकीत मेट्रोने जागा देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती पुस्तक विक्रेते व मेट्रो अधिकारी यांनी या संदर्भात चर्चा करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.