
प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करू या
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा
नागपूर, ता. ३ : कोरोनाच्या विदारक परिस्थितीतून आज पुन्हा आपण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित येत आहोत. ही दिवाळी सर्वार्थाने वेगळी आहे. दिवाळीचा सण साजरा करताना वातावरणात प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करून पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर जिल्ह्याच्या नागरिकांच्या दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या सावटात आम्ही या वर्षी गुढीपाडवा, दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ईद साजरी करू शकलो नाही. प्रत्येक सण उत्सव एवढेच नव्हे तर घरातील कार्यक्रम देखील मर्यादित स्वरूपात आम्हाला करावे लागले. मात्र अजूनही काही लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला नाही. माझी या दिवाळीच्या शुभपर्वावर सर्वांना विनंती आहे की, प्रत्येक नागरिकांनी दुसरा डोस घेण्याचा संकल्प नागरिकांनी घ्यावा. आगामी काळात राज्याच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू होणार असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.
नागरिक, आरोग्य सेवेतील कर्मचारी व पोलिसांच्या सहकार्यामुळे कोरोना जिल्ह्यात नियंत्रणात असला तरी धोका टळलेला नाही. हा धोका लक्षात घेऊन नागरिकांना दिवाळीचा सण साजरा करावा. बाजारांमध्ये गर्दी टाळावी तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. फटाके फोडताना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन नागरिकांनी करावे. वातावरणात प्रदूषण वाढणार नाही तसेच आगीच्या घटना घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. शहरातील वातावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
ही दिवाळी तुमच्या आमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू करणारी. नवी उमेद जागविणारी दिवाळी असावी. ही दिवाळी आपल्या सर्वांना सुखाची, समृद्धीची व आरोग्यदायी जावो, अशा सदिच्छांसह पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देत असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.