
मतदार यादी प्रसिद्ध, दावे व हरकती नोंदवाव्यात
नागपूर, दि. 𝟭𝟮 : स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नागपूरची निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मतदार यादी 𝟭𝟭 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संदर्भात दावे व हरकती नोंदण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी विमला आर. यांनी केले आहे.
मतदार यादीवर ज्यांना दावे, हरकती सादर करावयाचे असतील त्यांनी आपले दावे नमुना क्रमांक 𝟭𝟳 मध्ये प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाचे आत म्हणजेच 𝟭𝟴 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी नागपूर यांचे कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करावेत, असे मतदार नोंदणी अधिकारी, स्थानिक प्राधिकारी, मतदारसंघ नागपूर तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी कळविले आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षीक निवडणूक-𝟮𝟬𝟮𝟭 अंतर्गत स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नागपूरचा निवडणूक कार्यक्रम 𝟵 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. जिल्हयात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
स्थानिक प्राधिकारी मतदार संघ नागपूरची निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मतदार यादी 𝟭𝟭 नोव्हेंबर रोजी महानगर पालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पालिका कार्यालय व तहसील कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्यात आली आहे.