जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 ते 15 डिसेंबर कालावधीत करवसुली पंधरवाडा उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर. 10 डिसेंबर : ग्रामपंचायतीला करवसुली हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. कोविड-19 महामारीमुळे ग्रामपंचायतीची करवसुली झालेली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झालेली असून, ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधा व ग्रामविकासाकरीता मोठी अडचण भासत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कराचा भरणा मुदतीत करून ग्रामपंचायतीच्या विकासात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) कपिलनाथ कलोडे यांनी केले आहे.
ग्रामपंचायतींचा विकास करणे, ग्रामपंचायतीचे वीजबिल भरणा करणे, विद्युत व्यवस्था करणे, गावातील आरोग्य व पाणीपुरवठ्याची सुविधा करणे, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा व वीजबिल भरणा करणे, स्वच्छता विषयक बाबी आदी महत्वाची कामे करावयाची असतात. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये माहे डिसेंबर 2021 अखेरपर्यंत करवसुली शंभर टक्के होणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ही करवसुली 100 टक्के होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत दि. 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2021 या कालावधीत करवसुली पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या करवसुली पंधरवाडा उपक्रमांतर्गत, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न करून या पंधरवड्यात जास्तीत जास्त करवसुली होईल याकडे विशेष लक्ष द्यावयाचे आहे.
पंचायत समिती स्तरावरून वसुलीचे पथक तयार करण्यात येणार असून त्याकरिता पर्यवेक्षकीय अधिकारी, वसुली अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची निवड करण्यात येणार आहे. थकीतदारांना पंचायत समिती स्तरावरून नोटीस देण्यात येऊन करवसुलीचा भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर वर्षनिहाय थकीतदाराची यादी तयार करून ती पंचायत समिती स्तरावर सादर करण्याची कार्यवाही करण्यास ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सूचना देण्याबाबत गट विकास अधिकारी यांना कळविण्यात आले आहे. पाणी करवसुली करिता थकीतदारांची वर्षनिहाय यादी तयार करून कराचा भरणा न करणाऱ्यास नळ पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये कार्यवाही करून थकित रक्कम वसुलीची कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
कारखाने, टॉवर व इतरही मालमत्तेवर लावण्यात आलेल्या कराची वसुली करण्यास खातेदाराची प्रत्यक्ष भेट घेण्यात येऊन आवश्यकता भासल्यास कायदेशीर कार्यवाही करत वसुलीची कार्यवाही करण्यात येईल. करवसुली करिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये कार्यवाही करून आवश्यक तेथे जप्तीचे अधिपत्र बजावून, नियोजनाद्वारे, लोकअदालतीच्या माध्यमातून करवसुली पंधरवड्यामध्ये वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे.