कोरोना साथीवर मात करण्यासाठी निर्णय आवश्यक
लॉकडाऊनचा कालावधी वाढू नये म्हणून दक्षता पाळा
– पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन करणे अत्यावश्यक झाले आहे. संक्रमितांची संख्यावाढ रोखण्यासाठी अमरावती महापालिका क्षेत्र व अचलपूर नगरपालिका क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत असून, 22 फेब्रुवारीच्या रात्री आठपासून दि. 1 मार्चच्या सकाळी सहापर्यंत तिथे संचारबंदी लागू असेल. वैद्यकीय व जीवनावश्यक सेवांना यातून सूट दिली आहे. कोरोना साथीवर मात करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे.
नागरिकांनी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोनावर मात करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले. महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, महापालिकेकडून बबलू शेखावत, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, बाधितांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. गत सप्टेंबरमध्ये सर्वाधिक केसेस होत्या, त्यापेक्षाही केसेस आता आहेत. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाकी सर्व सेवा बंद राहतील. या काळात सर्व नागरिकांनी स्वत:ची व इतरांचीही काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हातांची स्वच्छता व सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. हे पालन न केल्यास आणखी रुग्णांची संख्या वाढून लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढविण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापालिका, पोलीस, वाहतूक शाखा यांनी संयुक्त मोहिम राबवून नियमभंग करणा-यांवर कडक कारवाई व्हावी. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या सेवा सुरू राहतील, पण तिथेही गर्दी टाळण्यासाठी वेळेची मर्यादा राहील. संचारबंदीचा भंग करणा-यांवर वेळीच कारवाई व्हावी, असेही निर्देश त्यांनी दिले. अमरावतीत 1600 खाटांची उपलब्धता आहे. खासगी रुग्णालयांतील खाटांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आवशयक तिथे सेंटर्स वाढविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
अमरावती, अचलपूर येथे संचारबंदी
बैठकीतील चर्चा व निर्णयांनुसार जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्याकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार अमरावती महापालिका व अचलपूर नगरपरिषद क्षेत्रातील सर्व जीवनावश्यक दुकाने, किराणा, औषधी दुकाने, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील. यात ग्राहकांनी प्रवास टाळून नजिकच्या दुकानांचा वापर करावा. दरम्यान दोन्ही शहरातील सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या दोन्ही शहरात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्यासाठी पूर्वी परवानगी दिली आहे, ते उद्योग सुरू राहतील. दोन्ही शहरातील सर्व आठवडी बाजार (जसे की इतवारी बाजार, बिच्छू टेकडी शुक्रवार बाजार आदी) बंद राहतील.
शासकीय कार्यालयांनाही मर्यादा
सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, एनआयसी, अन्न व नागरी पुरवठा, एफसीआय, महापालिका सेवा वगळून) या 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरु ठेवता येईल. सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा) येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई- माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे आदी कामासाठी परवानगी अनुज्ञेय राहील.
मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतुकीसाठी निर्बंध राहणार नाही. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे अधिकारी, तहसीलदार यांनी सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी येणारे, जाणारे प्रवासी यांना वाहतुकीबाबत परवानगी अनुज्ञेय करावी. ठोक भाजीमंडई पहाटे 3 ते 6 या कालावधीत सुरु राहील मात्र, त्यात किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश मिळेल. लग्नासाठी फक्त 25 व्यक्तींना परवानगी अनुज्ञेय राहील. त्यासाठी महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांनी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांकडून परवानगी मिळवणे आवश्यक असेल.
जे. ई. ई. ला परवानगी
अमरावती व अचलपूरमधील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक केंद्रे, शिकवण्या बंद राहतील. या कालावधीत शासकीय, जे. ई. ई. प्रवेश परीक्षा व तत्सम परीक्षा यासाठी परवानगी राहील. दोन्ही शहरातील चित्रगृहे व बहुविध चित्रगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने आदी बंद राहतील व सर्व प्रकारचे राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक ठिकाणे बंद राहतील. सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील.
अमरावती व अचलपूर वगळता इतर क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश
प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील इतर नागरी व ग्रामीण क्षेत्रासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने व आस्थापना सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरु राहील. यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरु राहतील. शासकीय कार्यालयांतून 15 टक्के किंवा कमीत कमी 15 कर्मचारी उपस्थित असतील. भोजनालये, उपाहारगृहे प्रत्यक्ष सुरु न ठेवता पार्सल सेवा देऊ शकतील. लग्नासाठी फक्त 25 व्यक्तींना परवानगी अनुज्ञेय राहील.
सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी यांना ई- माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे यासाठी परवानगी राहील. मालवाहतूक व वाहतुकीवर निर्बंध नाहीत.सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी गाडीमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीनचाकी गाडीमध्ये (उदा. ऑटोरिक्षा) चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील.
आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवासीसह सोशल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करुन वाहतुकीसाठी परवानगी अनुज्ञेय राहील. सर्व धार्मिक स्थळे एकाचवेळी 10 व्यक्तीपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. ठोक भाजीमंडई पहाटे तीन ते सहादरम्यान सुरु राहील. तिथे केवळ किरकोळ विक्रेत्यांना येता येईल. शाळा, शिकवण्या बंद राहतील. व्यायामशाळा, चित्रगृहे, तरणतलाव, उद्याने बंद राहतील. सर्व प्रकारचे कार्यक्रम, संमेलने बंद राहतील.
या आदेशानुसार सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते 5 सुरु राहतील. आठवड्याअखेर शनिवारपासून सोमवारपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. आठवड्याअखेरच्या संचारबंदीत दुधविक्रेते, डेअरी यांची दुकाने सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरू राहतील.