Breaking News

कोरोना वाढतोय ; गरज नसेल तर घराबाहेर पडू नका – जिल्हाधिकारी

अनिर्बंध वागणाऱ्यांवर कडक कारवाई : गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासन सक्त
• मंगल कार्यालय, रिसॉर्ट, लॉन्सवर कारवाई करणार
• ग्रामीण भागात सोमवारपासून चाचणी संख्या वाढवणार
• खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार
• प्रवास करून आलेल्यांना चाचणी करण्याचे आवाहन
• उपायोजना नसतील तर शाळा कॉलेज बंद ठेवा
• मॉल्स, सर्व प्रकारची दुकाने, रेस्टॉरंट मैदानात गर्दी नको
• कामठी, काटोल, सावनेर या शहरांवर विशेष लक्ष
• ‘सुपर स्पेडर ‘ची तपासणी करण्यासाठी विशेष अभियान

नागपूर, दि. 20 : नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडूच नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सोबतच सोमवारपासून चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येत असून ‘सुपर स्प्रेडर’ असणाऱ्या घटकांना तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गर्दीची ठिकाणे, मंगल कार्यालय, अनिर्बंध वागणाऱ्या नागरिकांवर आता सक्त कारवाई करण्याचे निर्देश आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

जिल्हा परिषदेत आज घेण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये सोमवारपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक वितरण व सेवेत सहभागी असणारे (सुपर स्प्रेडर) अर्थात अनेकांच्या संपर्कात येणारे भाजीवाले, दुधवाले, सलून, घरकाम करणाऱ्या महिलांच्या चाचण्यांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिकांनी विना मास्क बाहेर पडू नये, विना मास्क बाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करा, असेही स्पष्ट केले आहे.या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, डॉ. असीम इमानदार आदी उपस्थित होते.

लग्न -गर्दीवर नियंत्रण आणा

बैठकीनंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हयातील नागरिकांसाठी व्हीडीओ संदेश जारी केला. ते म्हणाले, नागपूर जिल्ह्यामध्ये 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान केसेस 639 बाधित पुढे आले. मागच्या केवळ पाच दिवसांमध्ये 331 बाधित पुढे आले. यामुळे आपल्याकडे हा संसर्ग पसरतो आहे. हे निश्चिकत आहे. संसर्गाला जर कमी करायचे असेल तर आम्हाला सगळ्यांना स्वयंशिस्त बाळगावी लागेल. कुठलाही लग्न समारंभामध्ये ५० वर व्यक्ती असतील तर त्या मंगल कार्यालयाच्या विरुद्ध कारवाई करणार आहोत. त्या सोबतच जे वधूपिता असतील त्यांना सुद्धा कारवाईला सामोरे जावे लागेल. या शिवाय हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार मध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोक आढळले तर हॉटेल्सवर कारवाई करू शासकीय आदेशाची अवहेलना वारंवार करणाऱ्या मंगल कार्यालयाला, हॉटेल, रेस्टॉरंट, बारला काही दिवसांकरीता बंद ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लॉक डाऊन तूर्तास नाही

यावेळी त्यांनी तूर्तास लॉकडाऊन लावणार नसल्याचे सांगितले. बंदमुळे आर्थिक फटका बसू शकतो. यापूर्वी आपण अर्थचक्र बंद झाल्यानंतर सगळेच अडचणींना सामोरे गेलो आहोत. त्याचा अधिक फटका समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांना बसतो. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सकारात्मकरीत्या प्रतिसाद द्यावा. शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, शिक्षक, प्राध्यापक असतील त्यांनी कोरोना सारखे लक्षण असतील तर मोफत आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. शाळा कॉलेजेसमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करणे मुख्याध्यापक, प्राचार्य यांची जबाबदारी असेल. शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग करून घेतले पाहिजे.आणि लक्षणे असतील तर त्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रवेश देऊ नये. जिल्ह्यात कोरोना वाढतो आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाला सर्वतोपरी सहाय्य करावे ,असे आवाहनही त्यांनी आपल्या संदेशात केले आहे.

तालुका स्तरांवर सभा

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही वाढत्या संकटामुळे आता प्रत्येक मोठ्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना काटेकोरपणे करण्यासाठी 22 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषद सदस्य, तसेच जिल्हा परिषद सदस्य यांनी देखील या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. 22 तारखेला नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, नागपूर ग्रामीण याठिकाणी तर 23 ला हिंगणा, कामठी, मौदा, कुही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सहवासितांचा शोध मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविणे, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्पेडर तपासणी व मृत्यू संदर्भातील अन्वेषण करण्याबाबत या बैठकांमध्ये निर्देश दिले जाणार आहे.

शाळा भेटीसाठी पालक अधिकारी

कोविड प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये कोरोना प्रोटोकॉल पाळला जातो, अथवा नाही यासाठी 22 तारखेपासून शाळांचे निरीक्षण केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेच्या तपासणीकरिता पालक अधिकाऱ्याची नेमणूक जिल्हाधिकार्यांशनी केली असून 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजपर्यंत या पालक अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला आपला अहवाल सादर करायचा आहे.

शाळा कॉलेजसाठीही निर्देश जारी

जिल्ह्यात नुकतेच शाळा कॉलेज सुरू झाले असून या ठिकाणी कोविड प्रोटोकॉल नुसार सूचनांचे पालन होते, अथवा नाही याची खातरजमा करण्याबाबतही जिल्हाधिकारी निर्देशीत केले आहे. शाळेत विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यास शाळा महाविद्यालय दहा दिवसांसाठी बंद ठेवावीत. संपूर्ण इमारत वर्गखोल्या निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात. याबाबत संबंधित तहसील कार्यालय,नियंत्रण कक्ष, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, यांना कळवावे. संबंधित विद्यार्थ्यांच्या जवळच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. शाळा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर थर्मल गन द्वारा विद्यार्थ्यांचे तापमान घेण्यात यावे, आदी सूचना आदेशात करण्यात आल्या आहेत.
******

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved