Breaking News

नागपुर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू – जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान

नागपूर, दि. 15 –जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 4 हजार 610 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सुमारे 44 लाख 94 हजार 784 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी, जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाचे ७५ टक्क्यांवर मतदानाचे लक्ष्य आहे. केवळ प्रशासनाने मानस व्यक्त करून हा संकल्प साध्य होणार नाही. यासाठी मतदारांनीही प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाधिक संख्येने मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॅा. इटनकर यांनी यावेळी केले.

सहाय्यक पोलिस आयुक्त निसार तांबोळी यांनी शहरी भागात तर जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामीण भागात पोलीस विभागाने केलेल्या तयारीची माहिती यावेळी दिली. यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदी विषयांची माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस विभागामार्फत सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

असा असणार निवडणूक कार्यक्रम

जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. दि. 22 ऑक्टोबर रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल. 29 आक्टोबर हा नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात येणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 4 हजार 610 मतदान केंद्र

जिल्ह्यात एकूण 4 हजार 610 मतदान केंद्र असणार आहेत. यात काटोल विधानसभा मतदारसंघात 332, सावनेर 370, हिंगणा 472, उमरेड 395, कामठी 524, रामटेक 359, नागपूर दक्षिण पश्चिम 378, नागपूर दक्षिण 350, नागपूर पूर्व 364, नागपूर मध्य 308, नागपूर पश्चिम 351, आणि नागपूर उत्तर 407 अशी एकूण 4 हजार 610 मतदान केंद्र असणार आहेत. यात उंच इमारतींमधील 11 आणि झोपडपट्टी भागातील 9 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

राज्य सीमेवर विशेष दक्षता

मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र असल्यास गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच मध्य प्रदेशलगतच्या राज्य सीमेवरील चेकपोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, वन तसेच पोलीस विभागांच्या पथकांमार्फत चेक पोस्टवर विशेष दक्षता घेण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर राहणार विशेष लक्ष

सोशल मीडिया, फेक न्यूजवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरीत खंडन करण्याची व कारवाई करण्याची खबरदारी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

मतदारांनो, व्होटर हेल्पलाईन ॲपवर नाव शोधा

व्होटर हेल्पलाईन ॲपवर मतदारांना आपले नाव शोधता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांनी मतदानासाठी आपले नाव शोधून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पट्टेदार वाघाने हल्ला चढवून तिघांना केले गंभीर जखमी

उरकुडपार ,किटाडी,गरडापार येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात आज दिनांक ०४/०८/२०२४ …

शेवगाव शहरातील अनेक प्रभागातील अन उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत नागरिक त्रस्त

  अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवा व शहरातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved