Breaking News

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात नवीन निर्बंध लागू

 

नियमांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शाळा – महाविद्यालयांत प्रत्यक्ष शिकवणी बंद, लसीकरण सत्राला परवानगी

लग्न समारंभास 50 तर अंत्यविधीस 20 जणांची परवानगी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 10 जानेवारी : गत आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-19 विषाणुच्या प्रादुर्भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता शासन आणि प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करून स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लागू करण्यात आले आहे. सदर निर्बंध चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक 10 जानेवारी 2022 च्या रात्री 12 वाजेपासून लागू राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.

असे आहेत निर्बंध : नागरिकांच्या पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी राहील. तसेच अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी आहे. शासकीय कार्यालयामध्ये महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकावर बंदी राहील. कार्यालय प्रमुखाच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे.

खाजगी कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात 50 टक्क्यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचा विचार करावा. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हॅंड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत.

लग्न समारंभासाठी कमाल 50 व्यक्ती, अंत्यविधीसाठी कमाल 20 व्यक्ती तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमास कमाल 50 व्यक्तींनाच परवानगी असेल. शाळा आणि कॉलेज कोचिंग क्लासेस, विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम, प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी आस्थापना व्यतिरिक्त करायचे कामकाज, आदी बाबी वगळता 15 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. स्विमिंग पूल, स्पा, वेलनेस सेंटर पूर्णतः बंद राहतील. हेअर कटिंग सलुन, ब्युटी सलून 50 टक्के क्षमतेने सुरु तर रोज रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. हेअर कटिंग सलून व्यवसायिकांनी कोविड विरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे. तसेच ग्राहक व केस कापणाऱ्या सर्वांचे पूर्ण लसीकरण झालेले असणे बंधनकारक आहे.

शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांचे शिबिर स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या आयोजनाला बंदी राहील. इंटरटेनमेंट पार्क, प्राणिसंग्रहालये, वस्तुसंग्रहालये, किल्ले आणि अन्य सशुल्क ठिकाणी नागरिकांसाठीचे कार्यक्रम, स्थानिक पर्यटन स्थळे बंद राहतील. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प स्थळाबाबत सदर आदेश 11 जानेवारी 2022 च्या रात्री 12 वाजेपासून लागू राहील.

शॉपिंग मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स व उपहार गृह, नाट्यगृह, सिनेमा थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहील, सर्व आगंतुकाच्या माहितीसाठी आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील.

सर्व शॉपिंग मॉल्स व मार्केट दररोज रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद राहतील. रेस्टॉरंट उपहारगृहास दररोज होम डिलिव्हरीला परवानगी राहील. आंतरराष्ट्रीय प्रवास भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करता येईल तर देशांतर्गत प्रवास कोविडरोधी दोन लसी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासापूर्वी, पर्यंत आरटीपिसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. कार्गो ट्रान्सपोर्ट, औद्योगिक कामकाज व इमारतीचे बांधकाम पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तीकडूनच सुरू राहील. तसेच सार्वजनिक वाहतूक पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित वेळेनुसार राहील.

व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. व्यायाम शाळेमध्ये कुठलाही प्रकारचा व्यायाम अॅक्टिव्हिटी करतांना मास्क काढण्याची परवानगी नसेल. पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच या सुविधेचा लाभ घेता येईल. व्यायाम शाळेमध्ये कार्यरत असलेले सर्व कर्मचाऱ्यांचे पूर्ण लसीकरण झालेले असावे. प्रवासासाठी वैद्यकीय इमर्जन्सी, अत्यावश्यक सेवा, विमानतळ रेल्वेस्थानक, बसस्थानक येथे जाणे किंवा येण्याआधी वैध तिकिटे तसेच 24 तास सुरू राहणाऱ्या कार्यालयांसाठी, विविध पाळीमध्ये काम करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांच्या प्रवास अत्यावश्यक मानला जाईल.

दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल तसेच इ-कॉमर्स किंवा होम डिलिव्हरी करणाऱ्या आस्थापनेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. यासाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल. तसेच आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याचे आढळल्यास सदर आस्थापना बंद करण्यात येईल.या कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमित वेळानंतर सदर आस्थापनेने अॅटींजेन चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

कोविड व्यवस्थापनाच्या कामासाठी राज्य सरकारची कार्यालये किंवा राज्य सरकारद्वारे अर्थसहाय्यीत अन्य संस्थांचे कर्मचारी आणि संसाधने यांची मागणी करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राहतील.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 10 जानेवारी 2022 चे रात्री 12 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

बॉक्स : शाळा – महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवणी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून शिकविण्यास मुभा राहील. तसेच ज्या शाळा – महाविद्यालयात लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे, अशी शाळा – महाविद्यालये फक्त लसीकरणासाठी सुरू राहणार असून पालकांनी ठराविक वेळेत जाऊन आपल्या पाल्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अपक्ष उमेदवार मनोज मडावी यांचा काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – गोंड समाजाचे नेते तथा अपक्ष उमेदवार मनोज मडावी यांनी …

मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर विविध पथकांद्वारे नियंत्रण

जिल्हाधिका-यांच्या सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 : मतदानाच्या दिवशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved