
नागपूर दि. 20 : 21 ते 28 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक आठवडा राबविण्यात येणार आहे. जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण आणि रक्तक्षय होऊन सतत थकवा जाणवतो. शारिरीक व मानसिक विकास पुर्ण होत नाही म्हणून वय वर्ष 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा, महाविद्यालय या संस्था स्तरावर तर समुदाय स्तरावर जंतनाशक गोळ्या राष्ट्रीय जंतनाशक आठवड्यात देण्यात येणार आहेत.
या आठवड्यात कोरोनामुळे आशा वर्कर, अंगणवाडी सेविकामार्फत घरोघरी जाऊन या गोळ्या देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी दिली.
जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जंतनाशक आठवडा 21 ते 28 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा नुकताच आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील 13 तालुक्यात हा आठवडा साजरा करण्यात येईल. त्यासाठी अल्बेंडाझोल ही गोळी चावून खायची आहे. वयोगटानुसार ती वेगवेगळ्या पध्दतीने द्यावयाच्या सूचना आहे. 1 ते 3 वर्षाच्या बालकांना ती पावडर करून व पाण्यात विरघळून पाजायची आहे तर इतरांना ती चोखून खावयाची आहे. ग्रामीण भागातील बालकांना आशा, अंगणवाडी सेविकांद्वारे या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.