Breaking News

शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम आठ दिवसात जमा करा;

विम्याचे पैसे न मिळाल्यास विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे यांचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

मुंबई/चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून विमा कंपन्यांकडे प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रस्तावांबद्दल राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीची बैठक घेऊन विमा कंपन्यांना धारेवर धरले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर ‘पाहू, करु’ अशी भूमिका घेऊन चालढकल करून विम्याचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यास विमा कंपन्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये गेल्या तीन वर्षात विविध विमा कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा गुरुवारी मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आढावा घेतला. या बैठकीला कृषि विभागाचे सचिव श्री. एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार यांचेसह आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, इफ्को टोकियो, एचडीएफसी एर्गो, बजाज अलियांझ, एआयसी ऑफ इंडिया या विमा कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगाम २०२१ च्या पिक विमा योजनेमध्ये ८४ लाखांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी झाले असून त्यापोटी राज्य, केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचा हिस्सा मिळून ४५१० कोटी रुपये विमा हप्ता कंपन्यांना देय आहे. पिक काढणीपूर्वी पावसात खंड पडून आणि अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीस शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अदा करणेसाठी केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे विमा कंपन्यांना विमा रक्कमेचा पहिला हप्ता देणे आवश्यक आहे त्यामुळे विमा कंपन्यांना २३१२ कोटी रुपयांचा पहिला विमा हप्ता अदा केला आहे असेही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

जुलै २०२१ मध्ये पावसाचा खंड पडल्याने २३ जिल्हयातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी करून त्या आधारे एकूण ११.३५ लक्ष शेतकऱ्यांना ४२५ कोटी रुपये नुकसानभरपाई निश्चित झाली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३९ लक्ष शेतक-यांनी विमा कंपन्यांना नुकसानीची माहिती दिली. त्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत २३.२३ लक्ष शेतकऱ्यांना १५२५ कोटी रुपये रक्कम निश्चित झाली असून उर्वरित शेतक-यांची नुकसान भरपाई निश्चित करण्याचे काम अंतिम टप्यात असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

आजपर्यंत एकूण ३४.५९ लक्ष शेतक-यांना १९५० कोटी रक्कम निश्चित झाली असून त्यापैकी २२.७४ लक्ष शेतकऱ्यांना १०५२ कोटी रूपये वाटप झाले आहे. उर्वरित शेतक-यांची रक्कम निश्चित करणे व वाटप करणेसाठी पाठपुरावा सुरू असून सर्व कंपन्यांनी तत्वतः ही बाब मान्य केली आहे. सध्याच्या पावसामुळे होणारे नुकसान व पिक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान याबाबत विम्याची रक्कम निश्चित होणे अजून बाकी असून त्याची कार्यवाही सुरू असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संकटात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले चंद्रपूरचे प्रकल्प कार्यालय

एक लक्ष रुपयांची तात्काळ मदत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीमुळे बकऱ्या …

जिल्हा परिषदेच्या 24 शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत एकूण 24 जिल्हा परिषद शाळांत सेमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved