
पीएसए ऑक्सीजन प्लाँट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 28 जानेवारी: जिल्ह्यात कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधन तयार करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत संकल्प योजनेतंर्गत ऑपरेशन अॅंड मेंटेनन्स ऑफ ऑक्सीजन प्लाँट कोर्स राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ज्या ठिकाणी ऑक्सीजन प्लाँट उभारण्यात येत आहे, त्या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित पीएसए ऑक्सीजन प्लांट कोर्स पहिल्या बॅचचा शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना बाधित रुग्णांचे मृत्युचे प्रमाण वाढले होते. त्यासारखी परिस्थिती या तिसऱ्या लाटेत उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.
ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स ऑफ पी.एस.ए ऑक्सीजन प्लाँट या कोर्सकरिता फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशन, मेकॅनिक इत्यादी कोर्स पात्र 30 उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन रोजगार व मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत तर आभार अजय चंद्रपटन यांनी मानले.