अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 8 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 95 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोज तर 74 टक्के नागरिकांनी दोन्ही डोज घेतले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याची पहिल्या डोजची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा 8 टक्क्यांनी तर दुस-या डोजची सरासरी 6 टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात पहिल्या डोजचे सरासरी प्रमाण 87 टक्के तर दुस-या डोजचे सरासरी प्रमाण 68 टक्के आहे. या सरासरीपेक्षा चंद्रपूर जिल्हा अग्रेसर असून जिल्ह्यात 95 टक्के पहिला डोज तर 74 टक्के दुसरा डोज पूर्ण झाला आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत देण्यात आली.
बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक नितनवरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गार्गेलवार, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणाल्या, कालावधी होऊनही दुसरा डोज न घेणा-यांपर्यंत पोहचून त्यांचे लसीकरण करा. तरच जिल्ह्याची सरासरी आणखी वाढण्यास मदत होईल. सद्यस्थितीत जिल्ह्याची लसीकरणाची जी सरासरी आहे, त्यापेक्षा काही तालुक्यांची सरासरी कमी आहे. त्यामुळे अशा तालुक्यांच्या संपूर्ण यंत्रणेची स्वतंत्र बैठक घ्यावी. लसीकरण मोहिमेच्या जबाबदारीपासून कोणीही पळ काढू शकत नाही. सर्वांच्या सहकार्याने पात्र लाभार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण हेच जिल्हा प्रशासनाचे ध्येय आहे. जिल्ह्यात लसीकरणाच्या दोन्ही डोजची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असल्यामुळेच जिल्ह्यात निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. एवढेच नाही तर लसीकरण झाल्यामुळेच तिस-या लाटेत रुग्णालयात भरती असणा-या रुग्णांची संख्या अतिशय अल्प प्रमाणात (एक ते दीड टक्का) आहे, असेही त्यांनी सांगितले.