
जी भाषा परिवर्तन स्वीकारते तीच भाषा जिवंत राहते – डॉ.अनमोल शेंडे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली द्वारा पाच वर्षांनी महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याकरिता राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक समिती) महाविद्यालयात येते. ही समिती महाविद्यालयांशी इंग्रजी भाषेत संपर्क व संवाद साधत असते. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात आहेत. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षण मराठी या मातृभाषेतून झालेले असल्याने इंग्रजी भाषेतून संवाद साधताना अडचण निर्माण होते.
त्यामुळे मूल्यांकनाच्या श्रेणीवर त्याचा परिणाम होतो. तेव्हां या समितीने महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांशी मराठी भाषेतून संवाद व संपर्क साधावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. चंदनसिंह रोटेले यांनी आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील मराठी भाषा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागद्वारा आयोजित मराठी राजभाषा दिनानिमित्ताने आयोजित आभासी पद्धतीने झालेल्या व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना केले.या व्याख्यानमालेत वक्ते म्हणून विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथील डॉ. यशवंत घुमे व गो.वा. महाविद्यालय नागभीड येथील डॉ अनमोल शेंडे यांनी अनुक्रमे “मराठी भाषा आणि ग्रामीण विद्यार्थी” व “मराठी भाषेची सद्यस्थिती आणि आव्हाने” या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
इंग्रजी व हिंदी भाषेतून बोलणे हे अनेकांना भूषणावह वाटते परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी याबद्दल न्यूनगंड न बाळगता आपल्या बोलीभाषेतून व्यक्त झाले पाहिजे. अनेक ग्रामीण विद्यार्थी मराठी भाषेतून शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान झालेले आहेत. तेव्हा आपण आपल्या मराठी भाषेला कमी लेखू नये असे आव्हान डॉ.घुमे यांनी मांडले. तर भाषा ही त्या त्या राष्ट्राला विकासाकडे नेत असते. मराठी समाजाला अभिरुची संपन्न करीत असते. भाषा मनुष्य जातीला सूर्योन्मुख करून विकासाचे नवे नवे महाप्रकल्प आपल्यासमोर अंथरत असते.
असे मराठी भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व डॉ. शेंडे यांनी विशद केले. याप्रसंगी व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर होत्या. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक डॉ. विलास पेटकर, आभारप्रदर्शन डॉ. चंद्रभान खंगार यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आभासी पद्धतीने उपस्थित होते.