
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
वरोरा:-वरोरा शहरालगत नागपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या व बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शालिमार ट्रेडर्सच्या मागील वसाहतीत राहणाऱ्या कांबळे कुटुंबियातील मिष्ट्री संजय कांबळे वय 3 वर्ष व अस्मिन संजय कांबळे वय 5 वर्ष या दोन मुलांची विष पाजून त्यांच्या जन्मदात्या पित्यानेच (संजय श्रीराम काबळे वय अंदाजे 40) हत्त्या केल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान आज सकाळी गिरड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या साखरा मंगरुळ रोड च्या एका शेतात पित्याने सुद्धा आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आरोपी संजय कांबळे याचीही आत्महत्या ?
पोलीस आरोपी संजय कांबळे याचा कसून शोध घेत असतांना आज साखरा मंगरुळ रोड च्या एका शेतात त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान काल उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश चवरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी धनराज करकाडे हे रुग्णालयात दाखल झाले होते व या निरागस मुलांचा मृत्यू नेमका कशाने झाला याचे ठोस निदान लागावे म्हणून शव विच्छेदन करण्यासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. आज काही शेतकऱ्यांना साखरा मंगरुळ रोड च्या एका शेतात त्याचे प्रेत दिसल्याने पोलीस याचा पुढील तपास घेत आहे.