
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे आज दिनांक ११/१०/२०२२ रोजी वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला वं. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. तसेच वंदनीय श्री राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही सर्वधर्मसमभाव, बंधुभाव अशी मूल्ये समाजात रुजविल्याचे सांगत त्यांच्या हिंदी व मराठी भाषेतील अनेक रचनांचा उल्लेख करत प्रा. डॉ. सुरेश मिलमिले यांनी वं. राष्ट्रसंतांच्या जीवन कार्यावर मार्मिक असे भाष्य केले.
वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनकार्याने तारुण्यातच माझ्या व्यक्तिमत्वाला आकार आल्याचे सांगत देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृत कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन वं.श्री राष्ट्रसंतांनी केले. तसेच आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध त्यांनी केल्याचे प्रा. डॉ. सुनील झाडे यांनी याप्रसंगी सांगितले.
समुदाय प्रार्थनेच्या व अध्यात्माच्या माध्यमातून समाजाला नैतिकतेकडे नेण्याचे कार्य वं.श्री राष्ट्रसंतांनी केल्याचे सांगत ग्रामीण समाजातून अंधश्रद्धा व जातिभेद नष्ट व्हावा यासाठी त्यांनी भजन व कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी वडस्कर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विलास पेटकर यांनी तर आभार कु. कोमल वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पळून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.