Breaking News

छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड नको, नियमांचे करा पालन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

मुंबई / चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : निर्जल उपवास आणि सूर्यदेवाची आराधना करून सुख, शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करणाऱ्या तसेच छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या, कायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवून सहकार्य करा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. हा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन आपल्या सोबत आहे, असा विश्वासही त्यांनी दिला.

28 आक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या छट पूजा उत्सवाचा आढावा घेण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सहायक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मुंबई मनपाचे अति. आयुक्त संजीव कुमार, अमरजीत मिश्रा यांच्यासह पोलिस अधिकारी, सांस्कृतिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई येथील छट पूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांना विशेषतः महिलांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या. सुटसुटीत पार्किंग, प्रकाश व्यवस्था, फिरते स्वच्छता गृह, वाहतूक व्यवस्था, आपातकालीन स्थितीत कोस्टल सेफ गार्ड, जागोजागी सूचना फलक, कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त चोख असावा व मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व सूचनांचे पालन व्हावे, असे निर्देश सर्व संबंधित विभागांच्या प्रमुखांना देण्यात आले.

मुंबई शहरात 80 ठिकाणी छट पूजा संपन्न होते. त्यापैकी कुलाबा, जुहु यांसारख्या अधिक गर्दीच्या ठिकाणी काळजीपूर्वक व्यवस्था हाताळण्यात याव्या असेही ते म्हणाले. राज्यातील इतर जिल्ह्यात देखील जेथे छट पूजा उत्सव साजरा होतो, तेथेही सुरक्षेची व इतर सर्व काळजी घेण्यासंदर्भात निर्देश दिले जातील, असे श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले. आमदार आशिष शेलार यांनी देखील बैठकीत सूचना मांडल्या. त्यावर कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्याना सांगण्यात आले.

‘हाय टाईड’ असल्यास सावध रहा : दरम्यान हवामान खात्याशी सतत संपर्कात राहून या पर्वात समुद्रकिनारी पूजा करणाऱ्या भाविकांनी सावधगिरी बाळगावी. हाय टाईडची स्थिती असल्यास प्रशासन ज्या सूचना देईल त्यांचे पालन करावे, असे आवाहन देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक …

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved