
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नियोजित इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज (शुक्रवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी या महाविद्यालयात शिकणाऱ्या विदयार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला.
यासमयी उपस्थित विद्यार्थी आणि रत्नागिरीकर नागरिकांना संबोधित करताना कोकणात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोकणातच उच्च शिक्षणाची संधी मिळायला हवी या भावनेतूनच रत्नागिरीमध्ये शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्यात आले असल्याचे सांगत या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक नवीन तंत्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे नमूद केले.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यावर सगळ्यात आधी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेऊन अवघ्या ८ दिवसात त्यासाठी ५२२ कोटींच्या निधीला परवानगी दिली.
सध्या राज्यात अनेक उद्योग मोठी गुंतवणूक करत असून त्या माध्यमातून भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी येथील तरुणांना मिळणार आहेत. इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला इथेच रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तरुणांनी भविष्यातील या संधी ओळखून प्रस्तावित रिफायनरीचे देखील समर्थन करावे असे आवाहन देखील त्यांनी यासमयी केले.
त्यासोबत ‘श्रीमान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणां’ चे लोकार्पण देखील यावेळी करण्यात आले. या तारांगणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळातील वैज्ञानिक माहिती पाहण्याची, अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार आणि शासकीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.अभय वाघ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच रत्नागिरीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.