
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
बल्लारपूर :- आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कचेरी समोर भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी
भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला.
कोरोनाच्या काळात मागील वर्षीपासून बाजारपेठा व आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान व हाल होत आहेत. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला योग्य असा हमी भाव मिळत नाही, आठवडी व दैनंदिन बाजारपेठ बंद असल्याने मालाची नुकसान सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकारने मोठमोठे मॉल, दारूची दुकाने व इतर व्यवसाय सुरू करण्याची सुट दिली आहे आणि आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद ठेवण्यात येत आहेत. सरकार व प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे पिकवलेल्या शेतमालाला विकायचे तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरू असता तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून चार पैसे मिळाले असते. शेतकरी मोठ्या कष्टाने रक्ताचे पाणी करून भाजीपाला पिकवत आहे परंतु आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद असल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागत आहे. सरकार व प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. यावर सरकारने तात्काळ लक्ष देऊन भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी व त्यांच्या मालाला योग्य व रास्त भाव मिळण्याकरिता आठवडी बाजार व दैनंदिन बाजार तात्काळ सुरू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली.
शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने केराची टोपली दाखवली तर या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कचेरीवर शेतकऱ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार
असा इशारा राजूभाऊ झोडे यांनी सरकार व प्रशासनाला दिला.