Breaking News

महाआवास योजनेच्या माध्यमातून घरकुलाचे स्वप्न साकार करुया-प्राजक्ता लवंगारे-वर्मा

·उत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय पुरस्कारांचे वितरण

·गोंदिया व वर्धा जिल्हा ठरला सर्वोत्कृष्ट

·महाआवास योजना मासिकाचे विमोचन केंद्राचे 1 लाख 62 हजार तर राज्याचे जवळपास 49 हजार घरकुल पूर्ण

प्रतिनिधी नागपूर

नागपूर :- नागपूर दि. 30: महाआवास योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांसाठी गृहबांधणीचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले असून, या अभियानामध्ये विभागातून गोंदिया व वर्धा जिल्ह्यात सर्वोकृष्ट काम झाले आहे. महिलांच्या वित्त संस्थांचा घरबांधणीसाठीचा सहभाग कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गरजवंताला हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे –वर्मा यांनी आज येथे केले.

महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासोबतच राज्यात सर्वोत्कृष्ट विभाग म्हणून नागपूर नावलौकिक मिळवेल, असा विश्वास श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केला.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महाआवास अभियानांतर्गंत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियानामध्ये सर्वोकृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत तसेच वित्तीय संस्थांचा गौरव आज करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

वर्धेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरिता गाखरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, वर्धा जिल्हा परिषद अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, भंडारा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, विकास उपायुक्त अंकुश केदार, सहायक आयुक्त सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संघमित्रा कोल्हे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सर्वांसाठी घरे 2022 या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गंत हक्काचे घर मिळावे, यासाठी महाआवास योजना राबवित आहे. लोकसहभागामुळेच या योजनेचे रुपांतर अभियानात झाले आहे. विभागातील पुरस्कारप्राप्त जिल्ह्यांनी यापुढेही अंमलबजावणीमध्ये सातत्य ठेवून केंद्र शासनाचे पुरस्कार मिळवावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी केले.

महाराष्ट्राने देशाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना दिली. या योजनेच्या यशस्वीतेमुळे गावातील समस्या गावातच सोडविता येतात, हे सिद्ध झाले. त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वपूर्ण असून, कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही विभागातील नागरिक सक्रिय सहभागी झाल्यामुळे हे यश मिळाले आहे, असे सांगताना महाराष्ट्राच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची चर्चा देशभरात सर्वत्र झाली असल्याचे श्रीमती लवंगारे –वर्मा यांनी सांगितले.

नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्यपुरस्कृत विविध आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान ग्रामीणची अंमलबजावणी करण्यात आली असून, या योजनेच्या माध्यमातून कामे केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी केवळ एवढ्यावरच न थांबता केंद्र शासनाचे पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 लाख 62 हजार 383 घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत एकूण 48 हजार 898 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. तसेच द्वितीय पुरस्कार भंडारा जिल्हा तर तृतीय पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाला. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय तालुका म्हणून गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, गोंदिया व तिरोडा पंचायत समितीला अनुक्रमे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यासोबतच उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून गोंदिया जिल्ह्यातील तळेगाव, द्वितीय कोरंबी तसेच केसोरी या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गावांना पुरस्कार प्राप्त झाले. तृतीय पुरस्कार वर्धा ‍जिल्ह्यातील इंझाळा ग्रामपंचायतीला मिळाला.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी कर्ज देणारी वित्तीय संस्था म्हणून वर्धा जिल्ह्याची नारी शक्ती प्रभात संघ सिंधीविहिरी(कारंजा), द्वितीय भंडारा जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, आंधळगाव तर तृतीय वर्धा जिल्ह्यातील हिरकणी प्रभाग संघ, अंदोरी(देवळी) तसेच जागा व वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रथम वरोरा तालुका, द्वितीय कामठी तालुका तर तृतीय भद्रावतीचा पुरस्कारप्राप्त तालुक्यांमध्ये समावेश आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत वर्धा प्रथम

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये सर्वोकृष्ट जिल्हा म्हणून वर्धा जिल्ह्याला पुरस्कार मिळाला असून, द्वितीय क्रमांक भंडारा जिल्ह्याला तर तृतीय क्रमांक चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. उत्कृष्ट तालुक्यामध्ये प्रथम सडक अर्जुनी (गोंदिया), द्वितीय लाखांदूर, तृतीय पवनी पंचायत समिती, जिल्हा भंडाराने पटकावला आहे.

उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत बोरगाव(चंद्रपूर), द्वितीय दिघोरी (भंडारा) तर तृतीय सानगाव(साकोली) व ग्रामपंचायत चिचूर(कुही) नागपूर जिल्ह्याची या ग्रामपंचायतींनी पुरस्कार पटकावला. बांधकामासाठी कर्ज देणारी उत्कृष्ट वित्तीय संस्था म्हणून प्रथम वर्धा जिल्ह्यातील समानता प्रभाग संघ, समुद्रपूर, द्वितीय परिवर्तन प्रभाग संघ सेलू तर तृतीय सार्थक प्रभाग संघ वायफळ या वर्धा जिल्ह्यातील तीनही संस्थांचा या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अंकुश केदार यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त सुनिल निकम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी केले.

*******

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संत शिरोमणी रविदास महाराज समतावादी संत होते – प्राचार्य राहुल डोंगरे

शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा) – संत …

शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत “श्री छत्रपती शिवाजी महाराज” जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी वार सोमवार शिव मावळे ग्रुप तर्फे अखंड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved