जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
बुलडाणा, दि.27 (जिमाका): जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटी पार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून सुरु करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.
दिनांक 14 मार्च 2020 पासून कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 1 जुन 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यात लॉकडाऊनची मुदत दिनांक 30 जून 2020 रोजी रात्री 12 वा. पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. या आदेशामध्ये केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटीपार्लर्स प्रतिबंधित करण्यात आलेली होती. मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दिनांक 25 जून 2020 आदेशामध्ये केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स काही अटी व शर्तीस अधिन राहून प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरीत जिल्ह्यात दिनांक 28 जुन 2020 पासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
असे आहेत नियम
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जिल्ह्यातील केशकर्तनालये, सलून्स व ब्युटीपार्लर्स खालील अटी व शर्तींना अधिन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार सलून्स, ब्युटी पार्लर व केशकर्तनालये यामध्ये केवळ निवडक सेवा जसे की, केस कापणे, केसांना रंग (डाय) करणे, वॅक्सींग, थ्रेडींग आदी सेवांनाच परवानगी असेल. त्वचेशी संबंधित सेवांना परवानगी असणार नाही. या सेवा दिल्या जाणार नाहीत असा फलक दुकानामध्ये दर्शनी भागामध्ये सर्वांना दिसेल असा लावण्यात यावा.दुकान, ब्युटी पार्लर चालक / कर्मचाऱ्यांनी संरक्षक साधने जसे की, हातमोजे (हॅन्ड ग्लोव्हज), ॲप्रन व मास्क वापरणे बंधनकारक असेल. ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनीटज्ञईज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर दोन तासांनी सॅनीटाईज करणे बंधनकारक असेल.
तर फौजदारी कारवाई होणार
टॉवेल, नॅपकीन्स यांचा वापर एका ग्राहकासाठी एकाचवेळी करणे बंधनकारक राहील. दुसऱ्या ग्राहकासाठी त्याचा वापर करण्यात येवू नये. . नॉन डिस्पोजेबल साधने प्रत्येक वापरानंतर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. प्रत्येक दुकानात ग्राहकांच्या माहितीसाठी वरील सर्व खबरदारीच्या सूचना दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. शहरी भागात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पाहणी करून आदेशाचे पालन होत नसल्यास संबंधीतांवर तात्काळ शॉप ॲक्ट व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कार्यवाही करावी व परवाना रद्द करावा. उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.