Breaking News

रामाळा तलावाचे काम गतीने पूर्ण करा- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

तलावाचे पुनर्जीवन,पर्यटनदृष्ट्या विकसित, परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यावर विशेष लक्ष- पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

“हेरिटेज वॉक करुन बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची पर्यटन मंत्र्यांनी केली पाहणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी: जिल्ह्यातील इरई ही प्रमुख नदी असून नदीचे पात्र वाढवणे गरजेचे आहे. काही ठिकाणी पुरामुळे नदीचा जलप्रवाह थांबतो, त्यामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सर्वप्रथम नदीचे खोलीकरण करणे व रुंदीकरण करणे आवश्यक आहे. तसेच शहरातील रामाळा तलावाचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत रामाळा तलाव व इरई नदी पाहणी दरम्यान ते बोलत होते.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जराड, ताडोबाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरातील इरई नदी, रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरण तसेच जिल्ह्यातील पर्यटन विषयक चर्चा करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी वेळोवेळी आढावा बैठक घेतली. तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीने पर्यटन मंत्र्यांना पत्र दिले होते, त्याअनुषंगाने हा दौरा ठरला होता.

शहरातील रामाळा तलाव हा चंद्रपूरचा एतिहासिक वारसा असल्याने अनेक वर्षापासून तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरणाची मागणी होती. असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, रामाळा तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून कृषी विभाग व जिल्ह्यातील शेतकरी बांधव यांना शेतीसाठी तलावातील गाळ उपयोगी पडणार आहे. तलावातील गाळ काढण्याच्या कामाला जिल्हा खनिज विकास निधीतून मान्यता देण्यात आली असून 35 हेक्टर क्षेत्रापैकी 30 हेक्टर क्षेत्रात एक मीटर गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. रामाळा तलावाचे काम गतीने पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तसेच पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत नदीची भेट देत पाहणी केली. पावसाळ्यात पूर परिस्थितीमुळे नदीचे पाणी शहरात येते व पुरपरिस्थिती निर्माण होते, यासाठी इरई नदीचे सर्वप्रथम खोलीकरण करून रुंदीकरण करणे आवश्यक असुन पाणी अडवण्यासाठी इरई नदीवर बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

तलावाचे पुनर्जीवन करणे, पर्यटनदृष्ट्या विकसित करणे, तलावाजवळील परिसर स्वच्छ व सुशोभित करणे यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.असे सांगून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, रामाळा तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्णत्वास न्यावे, तलावाचे पाणी स्वच्छ ठेवल्यास इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीचा त्रास होणार नाही. तलावातील गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना अवगत करावे. लोकसहभागातून इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी विकासात्मक आराखडा तयार करावा, पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी कुठे वाढते याची माहिती घेऊन संरक्षक भिंतीचे काम करावे. अशा सूचना पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

तत्पूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शहरातील रामाळा तलाव, इरई नदी, बगड खिडकी चांदा किल्ला स्वच्छता मोहिमेची हेरिटेज वॉक करून पाहणी केली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले-राहुल डोंगरे

शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हे लोकप्रिय …

अवकाळी पावसाने झालेले नुकसान गांभीर्याने घ्या

तातडीची बैठक घेऊन दिले खा.सुनिल मेंढे यांनी सर्वेक्षणाचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-जयेंद्र चव्हाण भंडारा:-दोन दिवसांपासून सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved