
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर/ब्रम्हपुरी:-ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यात उन्हाळी भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील हे तालुके भात पिकासाठी प्रचलित असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळी धान पिक लागवड करणार्याची संख्या अधिक प्रमाणात आहे. सदर धान पिक शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेतात. शासनाकडून आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीस सुरूवात झाली आहे. सदर नोंदणीची अंतिम मुदत ३० एप्रिल आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतकर्यांना प्रशासकीय समस्या व तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांची आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणी झाली नाही,
शिवाय बहुतांश शेतकर्यांनी नोंदणी करण्यासाठी आवश्यक असलेली ई पीक पहाणी ही नेटवर्कची समस्या, मोबाईलचे अज्ञान, परावलंबी कारभार व इतर कारणांमुळे अद्यापही केली नाही. ई-पीक पहाणी अभावी सातबारा उतार्यावर उन्हाळी पेर्याची नोंद नसल्यामुळे, आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीस विलंब होत आहे. परिणामी जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे नोंदणीअभावी आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान विक्रीपासून वंचित राहणार आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटाच्या खाईत लोटल्या गेलेला असतांना, आधारभूत खरेदी पासून वंचित राहील्यास त्याला पुन्हा कर्जबाजारी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,
त्यामुळे ब्रम्हपुरी, नागभीड, चिमूर व इतर तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आधारभूत खरेदी योजनेतंर्गत रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भूते, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांच्या वतीने निवेदन प्रेषित केले. यावेळी डॉ. रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख ब्रम्हपुरी,
रमाकांत अरगेलवार, माजी शहरप्रमुख शामराव भानारकर, मनोज लडके उपतालुका प्रमुख नागभीड, विक्की मडकाम माजी शहरप्रमुख, केवळराम पारधी उपतालुका प्रमुख, बालू सातपुते तालुका प्रमुख चिमूर, भाऊराव ठोंबरे विधानसभा समन्वयक, नाजीम शेख युवा सेना समन्वयक, बंडू पांडव उपतालुका प्रमुख, गणेश बागडे, मोरेश्वर अलोने विभागप्रमुख, रामचंद्र मैंद, राजेश दुपारे व गुलाब बागडे आदी. शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.